मडगाव पोलिसांनी केली कारवाई; चोरीची दुचाकीही जप्त

मडगाव: येथील मडगाव रेल्वे स्थानक परिसरातून दुचाकी चोरल्याप्रकरणी मडगाव पोलिसांनी महाराष्ट्रातील कोल्हापूर येथून संशयिताला ताब्यात घेतले आहे. अधीकुमार गिरमल (वय ३६) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव असून, त्याच्याकडून चोरीची दुचाकीही जप्त करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित अधीकुमार गिरमल हा मूळचा कोल्हापूरचा रहिवासी आहे. मडगाव येथील कोकण रेल्वे स्थानक परिसरातून एक दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार पोलिसांत नोंदवण्यात आली होती. या तक्रारीच्या आधारे मडगाव पोलिसांकडून कसून तपास सुरू होता. तपासादरम्यान तांत्रिक पुरावे आणि गुप्त माहितीच्या आधारे तपास अधिकाऱ्यांनी संशयिताचा माग काढला असता, तो कोल्हापूरमध्ये असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.
माहिती मिळताच मडगाव पोलिसांच्या पथकाने तातडीने कोल्हापूर गाठले. तेथे स्थानिक शाहूपुरी पोलिसांच्या मदतीने संशयित गिरमल याला ताब्यात घेण्यात आले. संशयिताला गोव्यात आणून रीतसर अटक करण्यात आली असून, त्याने चोरलेली दुचाकीही पोलिसांनी जप्त केली आहे. मडगाव पोलीस निरीक्षक अरुण गावस देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.