Home >> गोवा >> पणजीत १०० अळंब्यांसाठी मोजावे लागताहेत १५०० रुपये

पणजीत १०० अळंब्यांसाठी मोजावे लागताहेत १५०० रुपये

खरेदीसाठी खवय्यांची गर्दी : कारापूर-तिस्क येथे अळंब्यांचा ५०० रुपयांना वाटा

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
15 mins ago
पणजीत १०० अळंब्यांसाठी मोजावे लागताहेत १५०० रुपये

पणजी/साखळी : पावसाने काहीशी उसंत घेतल्यावर गोमंतकीयांना चाहूल लागते ती जंगलात वारुळांवर उगवणाऱ्या अळंब्यांची. राजधानी​ पणजीत (Panjim) मंगळवारी अळंबी (Mushroom) दाखल झाली. मात्र १०० अळंब्यांना तब्बल १५०० रुपये मोजावे लागत होते. ग्रामीण भागातून ही अळंबी विक्रीसाठी पणजीत आणली जातात. मात्र महाग असूनही अळंबी खरेदी करताना खवय्ये दिसत होते. दरम्यान, कारापूर-तिस्क येथे अळंबीचे पहिले पीक दाखल झाले असून सध्या एका वाट्याला ५०० रुपये असा महागडा दर आहे. तरीही अळंबी खरेदी करण्यासाठी खवय्यांची गर्दी होऊ लागली आहे.

पाऊस पडून वातावरणात काहीसा उकाडा निर्माण झाल्यानंतर वारूळांवर ही अळंबी उगवतात. या अळंबींच्या शोधात असणारे काही जाणकार लोक या वारूळांवर लक्ष ठेवून असतात. अळंबी ठराविक आकाराची झाली की ती लगेच काढून बाजारात विक्रीसाठी आणली जातात. साखळी-डिचोली भागात सर्वप्रथम कारापूर-तिस्क येथे अळंबी पाहायला मिळतात. रस्त्याच्या बाजूला अळंबीचे वाटे घेऊन बसणारी मंडळी हे या हंगामाचे वैशिष्ट्य असते.

हंगामाच्या सुरुवातीला मिळणाऱ्या या अळंब्यांना खवय्यांची मोठी पसंती असते. त्यामुळे वाढीव दरातही लोक ती खरेदी करतात. पूर्वी ही अळंबी मोजून ५० किंवा १०० अशी वाट्याला घातली जात होती व नगाप्रमाणे दर असायचा. परंतु आता नगाऐवजी वाट्याच्या स्वरूपात अळंबीची विक्री होते. त्यामुळे 

एका वाट्यात किती अळंबी आहेत, याचा अंदाज येत नसला, तरी वाट्याचे ठराविक पैसे मात्र एक रुपयाही कमी न करता घेतले जातात. 

पावसाने दडी मारल्याने आणि कडक ऊन पडत असल्याने अळंबीचे पीक आले आहे. पण महागाईमुळे ती सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर गेली आहेत. काही दिवसांत अळंबी मोठ्या प्रमाणावर बाजारात येण्याचा अंदाज असून त्यानंतर अळंबीचे दरही नियंत्रणात येण्याची​ शक्यता आहे.

दरवर्षी निसर्गातून मिळणाऱ्या अशा रानमेव्याचा आस्वाद प्रत्येकाने घेणे गरजेचे आहे. गोव्यात मिळणारी ही अळंबी रुचकर असल्याने ती सर्वांनाच प्रिय असतात. म्हणूनच महाग असली तरी लोक एकदा तरी अळंबी खरेदी करतात. 
- शिवनाथ गावस, एक ग्राहक
हेही वाचा
सर्व पहा