Home >> गोवा >> गोव्यात लवकरच मिळणार घरपोच आरोग्य सेवा : विश्वजीत राणे

गोव्यात लवकरच मिळणार घरपोच आरोग्य सेवा : विश्वजीत राणे

१०० नव्या रुग्णवाहिका घेणार

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
59 mins ago
गोव्यात लवकरच मिळणार घरपोच आरोग्य सेवा : विश्वजीत राणे

पणजी : गोव्यात लवकरच ‘स्टेट केअर’ हा उपक्रम सुरू केला जाणार आहे. यानुसार गरजू रुग्णांना काही आरोग्य सेवा घरपोच दिल्या जातील. यामध्ये फिजीओ थेरपी, पॅलेटीव्ह केअर, स्ट्रोक सपोर्ट आणि डायलिसिस रुग्णांसाठी वाहतूक व्यवस्था यांचा समावेश आहे. हा उपक्रम राबवणारे गोवा देशातील पहिले राज्य ठरणार असल्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे (Health Minister Vishwajit Rane) यांनी सांगितले. 

मंगळवारी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक (Sripad Naik), एनटीपीसीच्या क्षेत्रीय संचालक वंदना चतुर्वेदी व अन्य अधिकारी उपस्थित होते.

१०० नव्या रुग्णवाहिका घेणार : राणे 

राणे म्हणाले की, मागील साडेचार वर्षे राज्यातील आरोग्य सेवांमध्ये सुधारणा होत आहे. अन्य राज्यांच्या तुलनेत गोव्यात रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचण्याचा कालावधी खूपच कमी आहे. हा कालावधी दहा मिनिटांपेक्षा कमी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. राज्यातील आरोग्य व्यवस्था अधिक सुधारण्यासाठी निवडणुकीपूर्वी नव्या १०० रुग्णवाहिका घेतल्या जाणार आहेत. सध्या आमच्याकडे ४० रुग्णवाहिका उपलब्ध झाल्या आहेत. उर्वरित ६० रुग्णवाहिका सीएसआर निधीतून घेतल्या जातील. याशिवाय प्रत्येक तालुक्यात एक आपत्कालीन वैद्यकीय सेवा केंद्र उभारण्यात येणार आहे. 

सीएसआरअंतर्गत ६ कोटींच्या १९ रुग्णवाहिका गोमेकॉला : श्रीपाद नाईक 

मंत्री नाईक म्हणाले की, राज्य सरकार आरोग्य सुविधा वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. आज सीएसआर अंतर्गत ६ कोटी रुपयांच्या १९ रुग्णवाहिका गोमेकॉला देण्यात आल्या आहेत. गोवा लहान राज्य असले तरी येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. याशिवाय महाराष्ट्र कर्नाटकातील काही जिल्ह्यातील लोक आरोग्य सुविधांसाठी गोव्यामध्ये येतात. यामुळे गोव्यामध्ये आधुनिक रुग्णवाहिका असणे आवश्यक आहे. आज गोमेकॉच्या ताब्यात दाखल झालेल्या रुग्णवाहिका स्थानिक तसेच पर्यटकांना उपयुक्त ठरतील अशी आमची खात्री आहे. 

सर्वांच्या प्रयत्नांमुळे झाले शक्य

केंद्राने गोमेकॉमधील एमबीबीएसच्या ५० जागा वाढवण्यास मंजुरी दिली आहे. यासाठी आम्ही केंद्राचे आभार मानतो. हे कुणा एका व्यक्तीमुळे झालेले नाही. माझ्यासह विविध नेत्यांनी यासाठी प्रयत्न केले आहेत. भविष्यात डॉक्टरांची कमतरता भासू नये यासाठी या जागा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.