लाखो रुपयांचे साहित्य भस्मसात

सांगे: सांगे मतदारसंघातील (Sanguem assembly constituency) रिवण बाजारात सोमवारी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास एका रांगेत असलेल्या सहा दुकानांना अचानक भीषण आग लागली. या दुर्घटनेत दुकानांमधील सर्व साहित्य जळून खाक झाले. त्यात दुकानदारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. कुडचडे अग्निशामक दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले.
मिळालेल्या माहितीनुसार, रिवण बाजारातील एका बंद किराणा दुकानातून सकाळी अचानक धूर निघत असल्याचे स्थानिक लोकांच्या निदर्शनास आले. नागरिकांनी तातडीने दुकानाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. मात्र तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. या दुकानात झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका उडाला आणि ही आग वेगाने पसरत गेली.
या आगीच्या विळख्यात शेजारील आणखी एक किराणा दुकान, दोन हॉटेल्स, एक दारूचे दुकान आणि एका इन्शुरन्स कंपनीचे कार्यालय अशी एकूण ६ दुकाने आली. ही सर्व दुकाने पूर्णपणे भस्मसात झाली आहेत. स्थानिक पंच सदस्य उमेश वेळीप यांनी तातडीने अग्निशामक दलाला पाचारण केले. कुडचडे अग्निशामक दलाच्या जवानांनी वेळ न घालवता घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. यापूर्वीही याच भागातील एका किराणा सोसायटीला आग लागून मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर आता पुन्हा ही मोठी दुर्घटना घडल्याने स्थानिक नागरिकांना दैनंदिन सुविधांसाठी काही काळ त्रास सहन करावा लागणार आहे.
यापूर्वी याच ठिकाणी किराणा सोसायटीला आग लागली होती. आता ही दुसरी घटना घडली आहे. यामुळे दुकानदार आणि स्थानिक ग्राहक दोघांनाही त्रास होणार आहे. बाधितांना आवश्यक ते सर्व सहकार्य देण्यासाठी माझे प्रयत्न सुरू राहतील, असे सरपंच वैशाली नाईक यांनी सांगितले.
या बाजारात हॉटेल्स, किराणा दुकाने आणि इन्शुरन्स ऑफिस असल्यामुळे लोकांना चांगली सुविधा मिळत होती. आगीमुळे त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या कठीण काळात आम्ही सर्व दुकानदार बांधवांच्या पाठीशी असून त्यांना सहकार्य करण्यासाठी सदैव पुढे असू, असे माजी जिल्हा पंचायत सदस्य सुरेश केपेकर यांनी सांगितले.
बाधितांना योग्य ती मदत मिळणार: मंत्री सुभाष फळदेसाई
रिवण बाजारातील सहा दुकानांना आग लागून दुकानदारांवर मोठे संकट आले आहे. सरकारतर्फे या सर्व बाधित दुकानदारांना योग्य ती आर्थिक मदत मिळवून दिली जाईल. हा बाजार पुन्हा पूर्वीसारखाच गजबजलेला दिसेल यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी सांगितले.