सुनेविरुद्ध काणकोण पोलिसांत गुन्हा

पणजी : काणकोण तालुक्यातील माशे-दापट येथील घरातून तब्बल १७ लाख ५६ हजार ४४० रुपयांचे सोन्याचे दागिने, मौल्यवान वस्तू आणि महत्त्वाची कागदपत्रे चोरीला गेल्याप्रकरणी सुनेविरुद्ध काणकोण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चिखली-वास्को येथे वास्तव्यास असलेल्या तसेच मूळ दापट, माशे येथील रहिवासी ज्युली कार्नेरो यांनी दिलेल्या तक्रारीवरून वरील गुन्हा नोंदवण्यात आला. तक्रारीनुसार, २७ ऑक्टोबर २०२४ पूर्वी त्यांच्या दापट येथील घरातून त्यांची सून तमसीन सबिना टेलीस (रा. मालाड पश्चिम, मुंबई) हिने फिर्यादी, त्यांची मुलगी आणि मुलगा यांच्या मालकीचे सोन्याचे दागिने, मौल्यवान वस्तू तसेच महत्त्वाची कागदपत्रे त्यांच्या परवानगीशिवाय व नकळत चोरून नेल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या चोरीतील मुद्देमालाची एकूण किंमत १७,५६,४४० रुपये इतकी असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास काणकोण पोलीस ठाण्याचे (Canacons Police station) पोलीस उपनिरीक्षक अजित वेळीप करीत आहेत.