म्हापसा : साळगाव विधानसभा मतदारसंघाची निर्मिती १९८९ मध्ये करण्यात आली असून, त्यापूर्वी हा मतदारसंघ कळंगुट व हळदोणा मतदारसंघांत विभागला गेला होता. या मतदारसंघातून सतत चारवेळा निवडून येण्याचा पराक्रम माजी मुख्यमंत्री दिवंगत डॉ. विल्फ्रेड डिसोझा यांनी केला असून सध्या केदार नाईक हे विद्यमान आमदार आहेत. आमदार नाईक हे गेल्यावेळी काँग्रेसच्या उमेदवारीवर विजयी झाले होते, मात्र यंदा त्यांच्यासमोर काँग्रेस आणि भाजपच्या अंतर्गत राजकारणाचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
आमदार केदार नाईक हे यंदा भाजपच्या उमेदवारीवर निवडणूक लढवण्यास इच्छुक असून ते पक्षाच्या तिकिटासाठी प्रमुख दावेदार आहेत. गेल्या निवडणुकीच्या काळात माजी मंत्री जयेश साळगावकर यांना गोवा फॉरवर्ड पक्षातून भाजपमध्ये प्रवेश देण्याच्या निर्णयाला मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी जोरदार आक्षेप घेतला होता आणि पक्षापासून फारकत घेतली होती. भाजपच्या उमेदवारीसाठी त्यावेळी केदार नाईक हे प्रमुख दावेदार होते, परंतु काँग्रेसच्या उमेदवारीवर केदार नाईक हे विजयी झाले आणि भाजप कार्यकर्त्यांचा असंतोष या निवडणूक निकालावरून दिसून आला होता. त्यानंतर काही महिन्यांच्या राजकीय घडामोडींनंतर आमदार केदार नाईक हे काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये सामील झाले.
काँग्रेस पक्ष सोडल्यामुळे आमदार केदार नाईक यांच्यावर काँग्रेसचे कार्यकर्ते प्रचंड नाराज आहेत. काँग्रेसचा वापर करणे आणि नंतर आमदार बनल्यावर फेकून देणे, अशी नीती नाईक यांनी अवलंबल्याचा आरोप मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकारी करत आहेत. शिवाय जयेश साळगावकर व नंतर केदार नाईक हे भाजपात सामील झाल्यामुळे पक्षात जुने आणि नवीन कार्यकर्ते असा भेदभाव सुरू झाला असून या मतदारसंघात निवडक ‘समाज कार्ड’चाही वापर होत असल्याचे मागील चार निवडणुकांतून दिसून आले आहे.
परूळेकर आणि साळगावकर यांची तिकिटासाठी मोर्चेबांधणी
या मतदारसंघातून भाजपतर्फे पुन्हा निवडणूक लढवण्यास ज्येष्ठ नेते दिलीप परूळेकर यांच्यासह जयेश साळगावकर हे इच्छुक आहेत. त्यांनी निवडणुकीच्या दृष्टीने आपल्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेठी घेण्यास सुरुवातही केली आहे. माजी मुख्यमंत्री डॉ. विल्फ्रेड डिसोझा यांचा पराभव करत या मतदारसंघात भाजपची मुळे रोवण्याचे श्रेय दिलीप परूळेकर यांना जाते आणि दोनवेळा त्यांनी भाजपला या मतदारसंघात प्रतिनिधित्व मिळवून दिले होते. तसेच पूर्वीचे काँग्रेस कार्यकर्ते आणि जिल्हा पंचायत सदस्य असलेले जयेश साळगावकर हे २०१७ च्या निवडणुकीत गोवा फॉरवर्ड पार्टीच्या उमेदवारीवर आमदार म्हणून निवडून आले होते, परंतु नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. स्थानिक भाजप कार्यकर्ते तसेच मतदारांनी नाकारल्यामुळे साळगावकर यांचा मागील निवडणुकीत पराभव झाला होता आणि यावेळी पक्ष पुन्हा उमेदवारी देईल या आशेवर परूळेकर व साळगावकर आहेत.
काँग्रेसतर्फे मतदारसंघातील ज्येष्ठ नेते तुलिओ डिसोझा हे पुन्हा विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असून ते माजी मुख्यमंत्री डॉ. विल्फ्रेड डिसोझा यांचे जावई आहेत. २०१२ मध्ये पक्षाने माजी मंत्री दिवंगत सुरेश परूळेकर यांना तिकीट दिल्यामुळे नाराज होऊन त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती व ते दुसऱ्या क्रमांकावर आले होते. त्यानंतर २०१७ व २०२२ मध्ये काँग्रेसच्या उमेदवारीवर त्यांचा दावा होता, मात्र २०१७ मध्ये मतदारसंघातून कळंगुटचे माजी आमदार आग्नेल फर्नांडिस यांना उमेदवारी मिळाल्याने त्यांनी माघार घेतली होती, तर २०२२ च्या निवडणुकीत त्यांनी आमदार केदार नाईक यांच्यासाठी प्रचार कार्य केले होते.
तसेच काँग्रेसच्या उमेदवारीसाठी माजी उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष वीरेंद्र शिरोडकर हे दावेदार असून ते रेईश मागूश पंचायतीचे माजी सरपंच तथा विद्यमान पंच सदस्य आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते पक्षाशी एकनिष्ठ असून पक्षाच्या गट समितीची तुलिओ किंवा शिरोडकर यांना उमेदवारी मिळावी अशी इच्छा आहे.
मागील निवडणुकीत ‘आरजी’तर्फे रोहन कळंगुटकर यांनी साळगावमधून निवडणूक लढवली होती व ते १९२८ मते घेत तिसऱ्या क्रमांकावर आले होते. सध्या आरजी पक्षामध्ये दोन गंठ निर्माण झाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्येही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून गेल्यावेळप्रमाणे यंदाच्या निवडणुकीत या पक्षाचा प्रभाव साळगावमध्ये दिसण्याची चिन्हे कमी आहेत. दुसरीकडे, सामाजिक कार्यकर्ते राजेश दाभोळकर हे देखील साळगावमधून निवडणूक लढवण्यास इच्छुक असून ते आमदार केदार नाईक तसेच भाजप सरकारच्या कार्यपद्धतीवर सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाज उठवत आहेत.
• साळगाव मतदारसंघ हा सहा पंचायत क्षेत्रात विभागला आहे. यात साळगाव, गिरी, सांगोल्डा, रेईश-मागूश, पिळर्ण-मार्रा आणि नेरुल यांचा समावेश आहे.
• यापैकी तीन गावे किनारपट्टी भागात येतात, तर सांगोल्डा आणि पिळर्ण-मार्रा ही गावे पर्वरीशी जोडलेली आहेत.
• गेल्या साडेचार वर्षांत पिळर्ण औद्योगिक वसाहतीतील जलशुद्धीकरण प्रकल्प आणि साळगाव पठारावरील अत्याधुनिक वीज प्रकल्प अंतिम टप्प्यात आहेत. तसेच, रस्ते, भूमिगत वीज वाहिन्या आणि क्रीडा मैदानांचा विकास करण्यात आला आहे.
निवडणूक इतिहास आणि आकडेवारी
| निवडणूक वर्ष | उमेदवार (पक्ष) | प्राप्त मते |
|---|---|---|
| २००७ | दिलीप परुळेकर (भाजप) | ६,६३९ |
| विल्फ्रेड डिसोझा (राष्ट्रवादी काँग्रेस) | ४,६८२ | |
| २०१२ | दिलीप परुळेकर (भाजप) | १०,०८४ |
| तुलिओ डिसोझा (अपक्ष) | ४,२७६ | |
| २०१७ | जयेश साळगावकर (गोवा फॉरवर्ड पार्टी) | ९,७३५ |
| दिलीप परुळेकर (भाजप) | ७,५८९ | |
| २०२२ | केदार नाईक (काँग्रेस) | १०,०४५ |
| जयेश साळगावकर (भाजप) | ८,१४६ |


