
वास्को : येथील नव्या मासळी बाजारात (Vasco fish market) सांडपाणी घुसल्याने मासळी विक्रेते व ग्राहकांनाही मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. त्यामुळे संतप्त झालेल्या मासळी विक्रेत्यांनी बाजारातील गाळे रिकामे करून पुन्हा बाजाराबाहेरच मासळी विक्री सुरू केली आहे.
बाजारात सांडपाणी साचत असल्याने अस्वच्छ वातावरण निर्माण झाले होते. ग्राहक आणि विक्रेते दोघांनाही मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप विक्रेत्यांनी केला आहे. ही समस्या त्वरीत न सोडवल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.
कॉंग्रेस पक्षाचा सत्ताधारी गटावर निशाणा
दरम्यान, या समस्येवरून कॉंग्रेस पक्षाने सत्ताधारी गटावर निशाणा साधला आहे. आमदार कृष्णा साळकर आणि नगरसेविका शमी साळकर यांनी आतापर्यंत जवळपास दहा वेळा बाजाराची पाहणी केली असली, तरी सांडपाण्याची समस्या अद्याप कायम असल्याचा आरोप कॉंग्रेस पक्षाने केला आहे. तातडीने तांत्रिक अभियंत्याची नियुक्ती करून बाजारातील सांडपाण्याची समस्या एका आठवड्याच्या आत कायमस्वरूपी सोडवावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा मासळी विक्रेत्यांच्या समर्थनार्थ काँग्रेस रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करणार; असा इशारा दिला आहे.
मासळी विक्रेत्यांमध्ये नाराजी
दरम्यान, बाजारातील मूलभूत सुविधा आणि स्वच्छतेच्या प्रश्नांमुळे मासळी विक्रेत्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून समस्या मार्गी लावावी, अशी मागणीही विक्रेत्यांकडून करण्यात येत आहे.