
पणजी : पणजी महानगरपालिका (Corporation of the City of Panaji) क्षेत्रातील बेघर, निराधार आणि भिकारी व्यक्तींना तात्काळ मदत आणि आधार देण्यासाठी महानगरपालिकेने एक विशेष हेल्पलाईन सुरू केली आहे. शहरातील अशा लोकांचे पुनर्वसन करणे आणि त्यांना हक्काचा निवारा मिळवून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
महानगरपालिका क्षेत्रातील कोणत्याही भागात अशा व्यक्ती आढळल्यास, नागरिक ९४०३६८७४६० या क्रमांकावर थेट कॉल करून किंवा व्हॉट्सॲप संदेश पाठवून माहिती देऊ शकतात. अशा व्यक्तींची माहिती मिळताच महानगरपालिकेचे विशेष प्रतिसाद पथक, अल शदाई चॅरिटेबल ट्रस्टचे प्रतिनिधी आणि संबंधित विभागांचे अधिकारी तातडीने संबंधित ठिकाणी पोहोचतील. या व्यक्तींची सुरक्षित सुटका करून त्यांना काळजी व पुनर्वसनासाठी तयार केलेल्या निवारा केंद्रांमध्ये पोहोचवले जाईल. हा उपक्रम महानगरपालिका आणि अल शदाई ट्रस्ट यांच्यात झालेल्या सामंजस्य करारांतर्गत राबवला जात आहे.
सर्व बचाव आणि पुनर्वसन मोहिमा अत्यंत संवेदनशीलतेने, सहानुभूतीने आणि व्यक्तीच्या प्रतिष्ठेचा आदर राखून राबवण्याचे निर्देश महानगरपालिकेतर्फे देण्यात आले आहेत. नागरिकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा. अशा गरजू व्यक्ती आढळल्यास प्रशासनाला कळवावे असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे.
अल्पवयीन मुलांसाठी '१०९८' क्रमांकावर संपर्क साधावा
या प्रकरणांमध्ये अल्पवयीन मुले आढळल्यास, नागरिकांनी तात्काळ १०९८ या क्रमांकावर संपर्क साधावा. या मुलांना बाल कल्याण समिती समोर हजर केले जाईल आणि बाल संरक्षण कायद्यानुसार पुढील योग्य ती कारवाई केली जाईल असे महानगरपालिकेने कळवले आहे.