मुख्यमंत्री डॉ. सावंत : आयटीआय मध्ये १८० कोटींची गुंतवणूक

पणजी : भारत आणि युनायटेड किंग्डम (यूके) यांच्यात झालेल्या मुक्त व्यापार करारामुळे गोव्यातील विविध उत्पादने कोणत्याही शुल्काशिवाय यूकेमध्ये निर्यात करण्याचा मार्ग मोकळा झाला असून, राज्यातील एमएसएमई उद्योजक, मत्स्योद्योग आणि शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांनी केले. याचबरोबर राज्यातील आयटीआयच्या आधुनिकीकरणासाठी सरकार १८० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.
पणजी येथे बुधवारी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी न्यायमूर्ती अभय सप्रे, शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर, सांख्यिकी खात्याचे संचालक विजय सक्सेना, कौशल्य विकास खात्याचे संचालक विनायक कांबळी आदी उपस्थित होते.
आयटीआयमध्ये आधुनिक शिक्षणावर भर
मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील सर्व आयटीआय आयएसओ प्रमाणित झाल्या असून, आधुनिक अभ्यासक्रमांद्वारे विद्यार्थ्यांचे कौशल्य विकसित केले जात आहे. आठवी व दहावीनंतर आयटीआय पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे दहावी व बारावीच्या समतुल्य प्रमाणपत्र दिले जात असून, दहा वर्षांहून अधिक काळ कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्राधान्याने कायम केले जाईल.
या प्रदर्शनात विशेष विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या गणेशमूर्ती उपलब्ध असून, नागरिकांनी त्या खरेदी करून त्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केले.
‘शून्य अपघात’ गोव्याचे लक्ष्य
यावेळी माजी न्यायमूर्ती अभय सप्रे यांनी देशातील वाढत्या रस्ते अपघातांबाबत चिंता व्यक्त केली. हेल्मेट आणि सीटबेल्टचा वापर न करणे, मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणे तसेच वाहतुकीचे नियम मोडणे ही अपघातांची प्रमुख कारणे असल्याचे त्यांनी सांगितले. नियमांचे काटेकोर पालन केल्यास बहुतांश अपघात टाळता येऊ शकतात. गोव्याला 'शून्य अपघात राज्य' बनविण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
गोव्यातील उत्पादने यूकेमध्ये निर्यात करणार : मुख्यमंत्री
भारत-यूके करारामुळे गोव्यातील उत्पादने विनाशुल्क मुक्तपणे यूकेमध्ये निर्यात करता येणार असल्याने स्थानिक उद्योग, मत्स्योद्योग आणि शेतकऱ्यांनी अधिकाधिक निर्यातीवर भर द्यावा. गोमंतकीयांच्या कल्पकतेला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. औद्योगिक संघटनांचे सहकार्यही आवश्यक आहे.