काही तांत्रिक अडचणींनंतर यंत्रणा सुरळीत; वाहतुकीवर बारीक लक्ष

प्रतिनिधी गोवन वार्ता
पणजी : बुधवारपासून राज्यातील २६ जागांवर इंटेलिजेंट ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टम (आयटीएमएस) प्रणाली कार्यान्वित करण्यात आली. याआधी ही प्रणाली १ जुलैपासून सुरू करण्यात येणार होती. मात्र काही कारणास्तव याची तारीख पुढे ढकलून १५ जुलै करण्यात आली होती. पहिल्या दिवशी सुरुवातीला काही काळ प्रणालीमध्ये काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या. मात्र नंतर ही प्रणाली योग्य पद्धतीने सुरू झाली. पहिल्या दिवशी वाहतूक उल्लंघनाचे किती चलन जारी करण्यात आले याबाबतची माहिती मिळालेली नाही.
या यंत्रणेद्वारे वाहतूक उल्लंघनाचे चलन थेट मोबाईलवर पाठवले जाते. आयटीएमएस ही दंडात्मक कारवाई करणारी ऑनलाईन प्रणाली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), सेन्सर्स आणि कॉम्प्युटर व्हिजन या अत्याधुनिक तंत्राचा वापर करून ही यंत्रणा थेट वाहतुकीवर आणि वाहनांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवत आहे. वाहतूक नियमांचे उच्च तंत्रज्ञान असलेल्या कॅमेरातून त्याची तत्काळ नोंद केली जाते. नियमांचे उल्लंघन केल्यास डिजिटल चलन पुराव्यासह मोबाईलवर पाठवले जाते.
सध्या ही आयटीएमएस प्रणाली मेरशी, बिर्ला क्रॉस- वेर्णा, बेळ्ळे-नावेली, जुने मार्केट सर्कल-मडगाव, फातोर्डा, टाटा शो रूम- नुवे, गोवा सिरॅमिक्स- नुवे, गोरवटी-नुवे, नुवे बायपास, आर्ले सर्कल, बोलशे सर्कल- घोगळ मडगाव, मिसिंग लिंक लोटली, नावेली, पॉवर हावस सर्कल- मडगाव, मुंज विहार सर्कल- मडगाव, टायटन- वेर्णा, आयएफबी- वेर्णा, रवी कॅफे- वेर्णा, चिखली पंचायत, बेताळभाटी, ग्रीन हाऊस- कोलवा, मारिया हॉल- बाणावली, आंबेडकर सर्कल कुडचडे, तार-बस्तोडा म्हापसा, आकय- म्हापसा आणि धुळेर- म्हापसा येथे कार्यरत झाली आहे.
मोबाईल क्रमांक अपडेट करणे आवश्यक
आयटीएमएस प्रणाली कार्यरत असलेल्या ठिकाणी वाहन चालवताना मोबाईलचा वापर केल्यास प्रथम १ हजार रुपये, तर दुसऱ्या वेळी १० हजार रुपये चलन येणार आहे. सिग्नल मोडल्यास प्रथम ५०० रुपये, तर दुसऱ्या वेळी १,५०० रुपये चलन येणार आहे. सीट बेल्ट न घालणे, हेल्मेट न घालणे १ हजार रुपये, वेग मर्यादेचे उल्लंघन केल्यास वाहनाच्या प्रकारानुसार १ ते २ हजार रुपये दंड केला जाणार आहे. वाहनाने केलेल्या वाहतूक उल्लंघनाचा तपशील जाणून घेण्यासाठी, वाहनांची नोंदणी ‘परिवहन’ या संकेतस्थळावर करणे, तसेच मोबाईल क्रमांक अपडेट करावा लागणार आहे.