हरमनप्रीत सिंगकडे नेतृत्व : संघात अनुभवी, युवा खेळाडूंचा मिलाफ

नवी दिल्ली : तब्बल ५० वर्षांपासून हॉकी विश्वचषक विजेतेपदाच्या प्रतीक्षेत असलेला भारतीय संघ यंदा नव्या आशा आणि नव्या जोमाने मैदानात उतरणार आहे. हॉकी इंडियाने पुढील महिन्यात होणाऱ्या एफआयएच पुरुष हॉकी विश्वचषकासाठी २० सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली असून, अनुभवी बचावपटू आणि स्टार ड्रॅग-फ्लिकर हरमनप्रीत सिंग याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
१९७५ मध्ये भारताने पहिले आणि एकमेव हॉकी विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर पाच दशकांपासून भारतीय संघाला विजेतेपदाची प्रतीक्षा आहे. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताला कांस्यपदक मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या हरमनप्रीतकडून यंदाच्या विश्वचषकात मोठ्या अपेक्षा आहेत.
एफआयएच प्रो लीगच्या नुकत्याच झालेल्या युरोपियन टप्प्यात भारताची कामगिरी समाधानकारक झाली नव्हती. १६ सामन्यांत चार विजय, पाच बरोबरी आणि सात पराभवांसह भारतीय संघ नऊ संघांमध्ये आठव्या स्थानावर राहिला. आता ही निराशा मागे टाकून विश्वचषकात दमदार कामगिरी करण्याचा संघाचा निर्धार आहे.
गोलरक्षणाची धुरा मोहित एचएस आणि सूरज करकेरा सांभाळणार आहेत. बचावफळीत हरमनप्रीत सिंगसह जरमनप्रीत सिंग, अमित रोहिदास, जुगराज सिंग, संजय, सुमित आणि यशदीप सिवाच यांचा समावेश आहे. मिडफिल्डमध्ये मनप्रीत सिंग, हार्दिक सिंग, विवेक सागर प्रसाद, नीलाकांत शर्मा, राजिंदर सिंग आणि आदित्य अर्जुन लालगे यांच्यावर जबाबदारी असेल. आक्रमणाची धुरा मनदीप सिंग, दिलप्रीत सिंग, अभिषेक, सुखजीत सिंग आणि शिलानंद लाक्रा सांभाळतील.
चार खेळाडूंना संघाबाहेरचा रस्ता
प्रो लीगमध्ये खेळलेल्या अमनदीप लाक्रा, राजकुमार पाल, रबीचंद्र सिंग मोइरांगथेम आणि सेल्वम कार्ती यांना विश्वचषक संघात स्थान मिळालेले नाही. मुख्य प्रशिक्षक क्रेग फुल्टन यांनी संघनिवडीबाबत समाधान व्यक्त करत अनुभव आणि युवा जोशाचा योग्य मेळ साधल्याचे सांगितले. खेळाडूंची निवड त्यांच्या नावावर नव्हे, तर अलीकडील कामगिरीच्या आधारे करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
भारताचा २० सदस्यीय संघ
गोलरक्षक : मोहित एचएस, सूरज करकेरा. बचावपटू : हरमनप्रीत सिंग (कर्णधार), जरमनप्रीत सिंग, अमित रोहिदास, जुगराज सिंग, संजय, सुमित, यशदीप सिवाच. मिडफिल्डर : मनप्रीत सिंग, हार्दिक सिंग, विवेक सागर प्रसाद, नीलाकांत शर्मा, राजिंदर सिंग, आदित्य अर्जुन लालगे. फॉरवर्ड : मनदीप सिंग, दिलप्रीत सिंग, अभिषेक, सुखजीत सिंग, शिलानंद लाक्रा