Home >> क्रीडा >> पी. व्ही. सिंधूची धडाकेबाज कामगिरी

पी. व्ही. सिंधूची धडाकेबाज कामगिरी

चिनच्या हान यूला नमवत उपांत्यपूर्व फेरीत धडक

Story: गोवन वार्ता । न्यूज डेस्क |
16th July, 11:48 pm
पी. व्ही. सिंधूची धडाकेबाज कामगिरी

टोकियो : भारताची दोन वेळची ऑलिम्पिक पदकविजेती स्टार शटलर पी. व्ही. सिंधू हिने चालू हंगामातील सर्वोत्तम कामगिरीचे प्रदर्शन करत ‘जपान ओपन सुपर ७५०’ बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या दुसऱ्या फेरीच्या सामन्यात सिंधूने जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर असलेल्या चीनच्या हान यू हिचा सरळ गेममध्ये पराभव केला.
जागतिक क्रमवारीत १० व्या स्थानावर असलेल्या पी. व्ही. सिंधूने सुरुवातीपासूनच सामन्यावर आपले वर्चस्व राखले. तिने आपल्यापेक्षा उच्च मानांकन असलेल्या चिनी प्रतिस्पर्धी हान यूला केवळ ३५ मिनिटांत २१-१६, २१-१४ अशा फरकाने पराभवाची धूळ चारली. या दिमाखदार विजयासोबतच सिंधूने हान यूविरुद्धचा आपला हेड-टू-हेड रेकॉर्ड आता ८-१ असा मजबूत केला आहे.
सामन्याची सुरुवात काहीशी संथ झाली होती, मात्र अनसीडेड सिंधूने लवकरच आपला लय शोधला आणि पहिल्या गेमच्या मध्यंतरापर्यंत उत्कृष्ट शॉट्स खेळत आघाडी घेतली व पहिला गेम २१-१६ असा खिशात टाकला. त्यानंतर दुसऱ्या गेममध्ये तर सिंधूने चिनी खेळाडूला पुनरागमनाची कोणतीही संधी दिली नाही. तिने सुरुवातीलाच ८-० अशी एकतर्फी आघाडी घेतली आणि अखेर २१-१४ ने गेम व सामना दोन्ही आपल्या नावावर केले. उपांत्यपूर्व फेरीत पारंपरिक प्रतिस्पर्धी नोझोमी ओकुहाराशी लढतआता उपांत्यपूर्व फेरीत ३१ वर्षीय पी. व्ही. सिंधूचा सामना जपानच्या घरच्या मैदानावर खेळणाऱ्या आणि तिची जुनी प्रतिस्पर्धी असलेल्या नोझोमी ओकुहाराशी होणार आहे. दुसऱ्या फेरीच्या सामन्यात दक्षिण कोरियाची अव्वल मानांकित खेळाडू अन से-यंग हिने दुखापतीमुळे माघार घेतल्याने ओकुहाराला थेट ‘वॉकओव्हर’ मिळाला होता. या दोन्ही माजी जागतिक विजेत्या खेळाडूंच्या आगामी सामन्याकडे आता क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे.
पी. व्ही. सिंधू भारताची एकमेव आशा
जपान ओपनमध्ये आता पी. व्ही. सिंधू ही भारताची एकमेव आव्हानवीर उरली आहे. तत्पूर्वी, भारताच्या मिश्र दुहेरीच्या जोडीला दुसऱ्या फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. तनिषा क्रास्टो आणि ध्रुव कपिला या भारतीय जोडीने चीनच्या अव्वल मानांकित फेंग यान झे आणि हुआंग डोंग पिंग यांच्याविरुद्ध ४७ मिनिटे झुंज दिली, मात्र अखेर त्यांना २०-२२, १७-२१ अशा फरकाने पराभव स्वीकारावा लागला. इतर भारतीय खेळाडूंचे आव्हान आधीच संपुष्टात आल्यामुळे आता भारताच्या आशा केवळ सिंधूवर टिकून आहेत.