दक्षिण पश्चिम रेल्वेची माहिती : कॅसलरॉक-कुळे मार्गावरील अनधिकृत पायी प्रवास रोखण्यासाठी कृती आराखडा

जोयडा : गोवा-कर्नाटक सीमेवरील दूधसागर धबधबा (Dudhsagar Waterfall) पाहण्यासाठी रेल्वे ट्रॅकवरून (railway track) पायी जाणाऱ्या पर्यटकांची वाढती गर्दी प्रशासनासाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. विशेषतः कर्नाटकातील कॅसलरॉक (Castlerock Karnataka) आणि गोव्यातील कुळे (Collem Goa) येथून मोठ्या प्रमाणात पर्यटक (tourists) रेल्वे ट्रॅकचा वापर करून दूधसागरकडे जात असल्याने दक्षिण पश्चिम रेल्वे (South Western Railway), रेल्वे सुरक्षा दल, जोयडा पोलीस (Joida Police) आणि काळी व्याघ्र संरक्षित क्षेत्र प्रशासनाने कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे.
याच पार्श्वभूमीवर गुरुवारी रामनगर येथील विश्रामगृहात दक्षिण पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांसह हुबळी, बेळगाव, वास्को आणि लोंढा विभागातील रेल्वे अधिकारी, रेल्वे सुरक्षा दल, जोयडा पोलीस आणि काळी व्याघ्र संरक्षित क्षेत्राच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक पार पडली. बैठकीत कॅसलरॉक आणि कुळे या दोन्ही बाजूंनी रेल्वे ट्रॅकवरून दूधसागरकडे पायी जाण्यास बंदी कायम ठेवण्याचा निर्णय पुन्हा स्पष्ट करण्यात आला.
दक्षिण पश्चिम रेल्वेच्या माहितीनुसार, दूधसागर रेल्वे स्थानक हे प्रवाशांच्या चढ-उतारासाठी खुले नाही. तेथे गाड्या केवळ रेल्वेच्या तांत्रिक कारणांसाठी थांबतात. तरीही अनेक पर्यटक रेल्वे ट्रॅकवरून चालत, मालगाड्यांमध्ये अनधिकृतपणे प्रवास करून किंवा नियोजित थांबा नसताना एक्स्प्रेस गाड्यांमधून उतरून दूधसागर गाठण्याचा प्रयत्न करत आहेत.
संयुक्त गस्त, दंडात्मक कारवाई
- संयुक्त बैठकीत रेल्वे, आरपीएफ, पोलीस आणि वन खात्याने संयुक्त गस्त वाढविणे, कॅसलरॉक आणि कुळे परिसरातील प्रमुख प्रवेशबिंदूंवर विशेष लक्ष ठेवणे, पर्यटकांना जनजागृतीद्वारे परावृत्त करणे तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याचे निर्णय घेण्यात आले.
- दक्षिण पश्चिम रेल्वेने स्पष्ट केले आहे की रेल्वे ट्रॅकवर ट्रेकिंग करणे, रेल्वे हद्दीत अनधिकृत प्रवेश करणे किंवा रेल्वेच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणे हा भारतीय रेल्वे अधिनियम, १९८९ अंतर्गत दंडनीय गुन्हा असून संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.