धारगळ प्रवेश शुल्क बूथ तोडफोड प्रकरण

म्हापसा : धारगळ येथील प्रवेश शुल्क बूथ (टोल नाका) तोडफोड आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी महाराष्ट्राचे मंत्री आणि कणकवलीचे आमदार नीतेश राणे यांच्यासह इतर आरोपींविरुद्धच्या खटल्याचा निवाडा म्हापसा येथील प्रथमश्रेणी न्यायालयाने पुढे ढकलला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २३ जुलै रोजी होणार आहे. हा गुन्हा डिसेंबर २०१३ रोजी घडला होता.
संशयित आरोपी आमदार नीतेश राणे आणि त्यांच्या समर्थकांनी धारगळ येथील प्रवेश शुल्काची रक्कम देण्यास नकार देत बूथची तोडफोड करीत राडा घातला होता. तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना मारहाण केली होती. याप्रकरणी पेडणे पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम १४३, १४७, १४८, ३२४, ३३२, ३४२, ३५३, ४५२, ४२० सह १४९ आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक कायद्याच्या कलम ३ अन्वये गुन्हा दाखल केला होता.
या गुन्ह्याखाली नीतेश राणे, राहुल परब, मुकुंद परब, हरिश्चंद्र सावंत, राकेश परब, प्रशांत मालकर, विनम्र आचरेकर, सागर पाटील आणि संतोष राऊत यांना अटक केली होती. नंतर वरील संशयितांच्या विरोधात पोलिसांनी पेडणे न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणाची अंतिम सुनावणी म्हापसा प्रथमश्रेणी न्यायालयात पूर्ण झाली आहे.
खटल्याच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने नीतेश राणेंविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. त्यानंतर ६ जुलै रोजी नीतेश राणे न्यायालयात हजर झाले व त्यांनी आपला जबाब नोंदवला होता. १० जुलै रोजी न्यायालयात अंतिम युक्तिवाद पूर्ण झाला होता.
गुरुवार, १६ रोजी झालेल्या सुनावणीवेळी आरोपींच्या वकिलांनी आपल्या अशीलांना न्यायालयात हजर राहण्यापासून सवलत मिळण्यासाठी अर्ज सादर केला. न्यायालयाने हा अर्ज मंजूर केला व या खटल्याची सुनावणी २३ जुलैपर्यंत तहकूब केली.
सुनावणीवेळी न्यायालयात सरकारी अभियोक्ता तेजस पवार तर आरोपींच्यावतीने अॅड. अभय चिखलीकर हे उपस्थित होते.