सायबर गुन्हेगारांकडून चोरीची नवीन शक्कल : सावध राहण्याचे पोलिसांचे आवाहन

म्हापसा : एटीएममधून पैसे चोरण्यासाठी सायबर चोरट्यांनी नवी शक्कल अवलंबल्याचा धक्कादायक प्रकार म्हापशात उघडकीस आला आहे. मशीनला फेव्हिक्विक किंवा डिंक लावण्याची आणि लोकांना फसवून पैसे काढण्यासाठी ही वेगळी पद्धत चोरांनी शोधली असून म्हापसा शहरातील एका एटीएम मशीन प्रकरणातून आढळून आले आहे. यामुळे एटीएम कार्ड वापरणाऱ्या नागरिकांनी आता सावध तसेच काळजी घेण्याची गरज आहे.
सोमवारी १३ रोजी धुळेर येथील एका राष्ट्रीयीकृत बँकेच्या एटीएममध्ये हा प्रकार उघडकीस आला. हे चोर एटीएम मशीनच्या ज्या स्लॉटमध्ये आपण कार्ड टाकतो, तिथे फेव्हिक्विक किंवा डिंक लावतात. जेव्हा एखादा ग्राहक पैसे काढण्यासाठी तिथे जातो आणि आपले डेबिट कार्ड मशीनमध्ये टाकतो, तेव्हा ते कार्ड त्या डिंकामुळे आत घट्ट अडकून बसते. कार्ड अडकल्यानंतर ग्राहक गोंधळात पडतो आणि ते काढण्याचा प्रयत्न करतो. नेमका याच संधीचा फायदा घेऊन चोरटे तिथे लपवून ठेवलेल्या गुप्त कॅमेऱ्यांच्या साहाय्याने ग्राहकाचा एटीएम पिन चोरतात.
इतकेच नव्हे तर, ग्राहकाची दिशाभूल करण्यासाठी चोरट्यांनी एटीएम बूथमध्ये लपवलेल्या फोनद्वारे खोट्या व्हॉईस इन्स्ट्रक्शन्स देण्याची पद्धतही वापरली आहे. यामुळे ग्राहक फसला जातो आणि आपले कार्ड मशीनमध्येच सोडून निघून जातो. ग्राहक निघून गेल्यावर हे चोर कार्ड काढून ग्राहकाच्या खात्यातून पैसे लंपास करतात.
या प्रकाराची तक्रार एटीएम व्यवस्थापन करणाऱ्या एजन्सीने म्हापसा पोलिसांकडे केली आहे. पोलिसांनी या प्रकाराला दुजोरा दिला असला तरी अद्याप अधिकृत गुन्हा नोंदविण्यात आलेला नाही. प्रकरणाचा तपास सुरू असून संबंधित एटीएममधील सीसीटीव्ही फुटेजची छाननी केली जात आहे.
नागरिकांनी घ्यावी विशेष काळजी
या पार्श्वभूमीवर पोलिसांनी एटीएम वापरताना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. पिन क्रमांक टाइप करताना तो हाताने झाकावा, एटीएम मशीनमध्ये कोणताही संशयास्पद फेरबदल, अतिरिक्त उपकरण किंवा वस्तू दिसल्यास तत्काळ बँक अधिकारी किंवा पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.