
म्हापसा : खोब्रावाडा कळंगुट येथे निवासी खोली साफसफाई करणाऱ्या डब्ल्यूएस बीच रिसॉर्टच्या कर्मचारी असलेल्या महाराष्ट्रातील एका २२ वर्षीय युवतीचा विनयभंग करण्याचा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांनी सदर रिसॉर्टचा व्यवस्थापक अनुराग सिंग (रा. कळंगुट व मूळ उत्तरप्रदेश) याला अटक केली.
हा प्रकार सोमवार, २३ रोजी रात्री ११.३० ते १२.३० वा. दरम्यान घडला. पीडित युवती ही डब्ल्यूएस बीच रिसॉर्टमध्ये हाऊस किपींगची नोकरी करते. मॅनेजर संशयित आरोपी अनुराग सिंग याने तिला घटनेवेळी रिसॉर्टच्या जवळच असलेल्या आपल्या निवासी खोलीची साफसफाई करण्यासाठी बोलावून घेतले.
युवती खोलीची साफसफाई करत असताना संशयिताने तिला मागून घट्ट पकडले आणि नंतर तिचा विनयभंग केला. तसेच याबाबतची कुठेही वाच्छता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी पीडित युवतीने बुधवार, दि. १५ रोजी कळंगुट पोलिसांत तक्रार दिली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या ७४, ७५(१), ३५१(३) कलमान्वये गुन्हा दाखल केला व संशयिताला पकडून अटक केली.
संशयित आरोपीला गुरुवारी म्हापसा न्यायालयाने १४ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. त्यानुसार पोलिसांनी त्याची रवानगी कोलवाळ कारागृहात केली.
याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक लक्षी आमोणकर यांमया मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सनिशा नाईक या करत आहेत.