Home >> गोवा >> अमेरिकेचे इराणवर पुन्हा हवाई हल्ले; ३५ ठार, ३०० हून अधिक जखमी

अमेरिकेचे इराणवर पुन्हा हवाई हल्ले; ३५ ठार, ३०० हून अधिक जखमी

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
20 mins ago
अमेरिकेचे इराणवर पुन्हा हवाई हल्ले; ३५ ठार, ३०० हून अधिक जखमी

तेहरान : अमेरिकेने इराणवरील नौदल नाकेबंदी पुन्हा लागू केल्यानंतर नव्या हवाई हल्ल्यांची मालिका सुरू केली आहे.  या हल्ल्यांमध्ये किमान ३५ जणांचा मृत्यू तर ३०० हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती इराणच्या आरोग्य मंत्रालयाने दिली. (US fresh attacks in Iran kill at least 35, wound over 300: Health Ministry) मृतांमध्ये तीन महिला तसेच १८ वर्षांखालील सहा जणांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे.

इराणच्या आरोग्य मंत्रालयाचे जनसंपर्क प्रमुख होसेन केरमनपूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वाधिक जीवितहानी इराणच्या दक्षिणेकडील प्रांतांमध्ये झाली आहे.

दरम्यान, इराणच्या स्थलसेनेने आरोप केला की, अमेरिकन सैन्याने मंगळवारी पहाटे बंपूर काउंटीतील लष्करी तळावर १३ क्षेपणास्त्रांचा मारा केला. या हल्ल्यात इराणशहर ब्रिगेडच्या सात जवानांचा मृत्यू झाला. १३ जण जखमी झाले आहेत. लष्कराच्या निवासस्थाने, अतिथीगृहे आणि सुरक्षा चौक्यांना लक्ष्य करून मोठी जीवितहानी घडवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप इराणने केला आहे. मात्र, संरक्षणात्मक उपाययोजनांमुळे हानी मर्यादित राहिल्याचा दावा लष्कराने केला.

अमेरिकेने पुन्हा नौदल नाकेबंदी लागू करत इराणविरोधातील कारवाई तीव्र केली आहे. विशेष म्हणजे, मध्यपूर्वेतील संघर्ष संपवण्यासाठी दोन्ही देशांनी एक महिन्यापूर्वी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली होती. त्यानंतर पुन्हा हल्ले सुरू झाल्याने दोन्ही देशांतील तणाव पुन्हा शिगेला पोहोचला आहे.

हॉर्मोझगानमधील सिरिक, बंपूर, चाबहार, बंदर अब्बास, अहवाज आणि केश्म बेट येथे स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे.

इराणी सरकारी माध्यमांनी अमेरिकेवर नागरी भागांवर हल्ले केल्याचा आरोप केला आहे. मात्र, अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने (CENTCOM)  आरोप फेटाळून लावत, हुवेयझेह येथील गहू साठवण केंद्रावर हल्ला केल्याचा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे स्पष्ट केले आहे.

हेही वाचा
सर्व पहा