सात दिवसांत न काढल्यास चिंबलवासियांचा आंदोलनाचा इशारा

पणजी : युनिटी मॉल आणि प्रशासन स्तंभाचा प्रकल्प रद्द केल्यानंतर, सरकारने जीटीडीसीला बांधकाम स्थळावरील पत्र्याचे कुंपण काढणे तसेच ती जागा पुन्हा पहिल्या प्रमाणे करून देण्याचे आदेश दिले होते. सात दिवसांत ती दोन्ही कामे पूर्ण होणे अपेक्षित होते.
मात्र साडेपाच महिने झाले तरी ही दोन्ही कामे अद्याप झालेली नाहीत. पुढील सात दिवसांत ही कामे पूर्ण न केल्यास चिंबलवासीय पुन्हा तीव्र आंदोलन करतील असे अजय खोलकर यांनी सांगितले. गुरुवारी त्यांनी याबाबत उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. यावेळी गोविंद शिरोडकर यांच्यासह अन्य स्थानिक उपस्थित होते.
खोलकर यांनी सांगितले की, युनिटी मॉल आणि प्रशासन स्तंभ प्रकल्प रद्द करण्यासाठी आम्ही ४४ दिवस आंदोलन केले होते. प्रकल्प रद्द झाले तरी अद्याप येथील पत्र्याचे कुंपण कायम आहे. प्रकल्पासाठी येथील जमीन खणण्यात आली होती. ती देखील अजून तशीच आहे. काही मंत्री अद्याप युनिटी मॉल येणार असल्याचे सांगत आहेत.
याबाबत आम्ही काल बैठक घेतली होती. बैठकीत उर्वरित कामे त्वरीत पूर्ण करण्याबाबत निवेदन देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी मध्यस्थी केली होती. त्यामुळे आज आम्ही त्यांना निवेदन देण्यास आलो होतो.
गोविंद शिरोडकर म्हणाले की, बांधकाम ठिकाणची जागा खडकाळ आहे. येथे आधी पाच ते सहा मीटर खणून नंतर त्यामध्ये मोठे खडक घातले आहेत. पावसाळ्यात येथे पाणी भरून खंदकासारखी स्थिती होईल. येथे कोणी पोहायला गेल्यास अपघात होण्याची शक्यता आहे. यामुळे ही जागा त्वरित पूर्वी प्रमाणे करणे आवश्यक आहे.
ही जागा पहिल्याप्रमाणे करणे, येथील पत्रे काढणे याबाबत आम्ही मागील अनेक महिने पाठपुरावा करत आहोत. मात्र प्रशासन आमच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाने जीटीडीसीला सूचना द्याव्यात अशी मागणी आम्ही केली आहे.