पी. व्ही. सिंधू, लक्ष्य सेनला सोपे आव्हान

बीडब्ल्यूएफ विश्व बॅडमिंटन स्पर्धा २०२६: ; तरुण आयुष शेट्टीची थेट जागतिक क्रमवारीतील नंबर-१ शी टक्कर

Story: गोवन वार्ता । न्यूज डेस्क |
05th August, 11:52 pm
पी. व्ही. सिंधू, लक्ष्य सेनला सोपे आव्हान

नवी दिल्ली : भारतीय भूमीवर १७ वर्षांनंतर आयोजित होणाऱ्या प्रतिष्ठेच्या बीडब्ल्यूएफ विश्व बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा २०२६ साठीचा अधिकृत ड्रॉ जाहीर झाला आहे. भारतीय खेळाडूंच्या दृष्टीने हा ड्रॉ संमिश्र स्वरूपाचा मानला जात आहे. भारताची पाच वेळची पदक विजेती खेळाडू पी. व्ही. सिंधू आणि पुरुषांमधील प्रमुख खेळाडू लक्ष्य सेन यांना पहिल्या फेरीत सोपे आव्हान मिळाले असले, तरी भारताच्या उगवत्या ताऱ्याला आयुष शेट्टीला मात्र पहिल्याच फेरीत थेट जगातील अव्वल क्रमांकाच्या खेळाडूचा सामना करावा लागणार आहे.
जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत ५ पदके जिंकणाऱ्या नवव्या मानांकित सिंधूची पहिली लढत ६४ च्या फेरीत आयर्लंडच्या सोफिया नोबल हिच्याशी होणार आहे. सिंधूसाठी हे आव्हान तुलनेने सोपे मानले जात असून, या विजयाने ती मोहिमेची सुरुवात सकारात्मक करेल अशी अपेक्षा आहे.
पुरुष एकेरीत भारताच्या लक्ष्य सेनची गाठ पहिल्या फेरीत ऑस्ट्रियाच्या कॉलिन्स व्हॅलेंटाईन याच्याशी पडणार आहे. लक्ष्यने पहिले दोन सामने जिंकल्यास तिसऱ्या फेरीत त्याची गाठ थायलंडच्या कुंलावूत वितिदसार्न याच्याशी पडू शकते, जो अत्यंत चुरशीचा सामना ठरेल.
भारताचा अक्रमक आणि युवा खेळाडू आयुष शेट्टी याला पहिल्याच सामन्यात भीषण ड्रॉ मिळाला आहे. अमानांकित असलेल्या आयुषला पहिल्या फेरीत थेट जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या आणि अव्वल मानांकित शी युकी (चीन) याच्याशी भिडावे लागणार आहे. ही लढत पहिल्या फेरीतील सर्वात मोठी आणि कठीण लढत मानली जात आहे.
‘ड्रॉ’ भारताच्या दृष्टीने अनुकूल : गोपीचंद
भारतीय बॅडमिंटन संघाचे मुख्य प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी या ड्रॉवर समाधान व्यक्त केले आहे. भारतीय खेळाडू अनेक विभागांत मजबूत स्थितीत असून, यंदा भारत अनेक पदके जिंकण्यात यशस्वी ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.शी युकी आणि आयुष शेट्टी यांच्यातील सामन्याबाबत बोलताना गोपीचंद म्हणाले, भारताच्या दृष्टीने हा ड्रॉ चांगला आहे. पहिल्या फेरीतील सर्वात मोठा सामना म्हणजे शी युकी विरुद्ध आयुष शेट्टी हा असेल. आयुष हा अत्यंत आक्रमक आणि गुणवान खेळाडू आहे. अशा जागतिक दर्जाच्या खेळाडूचा सामना स्पर्धेच्या नंतरच्या टप्प्यापेक्षा पहिल्याच फेरीत करणे आयुषसाठी फायदेशीर ठरू शकते. जर आयुषने हा सामना जिंकला, तर त्याच्यासाठी संपूर्ण स्पर्धेचा मार्ग खुला होईल.
सिंधूची ऐतिहासिक ६ व्या पदकावर नजर
विश्व बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत पी. व्ही. सिंधूचे रेकॉर्ड अत्यंत चमकदार राहिलेले आहे. या स्पर्धेत मानांकनाला तिच्या दृष्टीने कधीच महत्त्व उरलेले नाही, कारण तिने यापूर्वीही कमी मानांकन असताना पदके जिंकली आहेत.
२०१३: १० वे मानांकन असताना कांस्यपदक पटकावले.
२०१४: ११ वे मानांकन असताना सलग दुसरे कांस्यपदक जिंकले.
२०१७ आणि २०१८: अनुक्रमे चौथे आणि तिसरे मानांकन असताना रौप्यपदक मिळवले.
२०१९: ५ वे मानांकन असताना जपानच्या नोझोमी ओकुहाराचा पराभव करत सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. ही कामगिरी करणारी ती पहिली भारतीय बॅडमिंटनपटू ठरली.
सिंधू आता तिच्या ६ व्या विश्व अजिंक्यपद पदकासाठी मैदानात उतरणार आहे.
या स्पर्धेत २०१७ मध्ये सिंधू आणि सायना नेहवाल यांनी (रौप्य व कांस्य), तर २०२१ मध्ये किदाम्बी श्रीकांत आणि लक्ष्य सेन यांनी (रौप्य व कांस्य) अशी दुहेरी पदके जिंकून भारताचे नाव उज्ज्वल केले होते.
दुहेरी विभागात भारतीय जोड्यांना ‘बाय’
पुरुष दुहेरी: भारताची स्टार आणि ५ वी मानांकित जोडी सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांना पहिल्या फेरीत बाय मिळाला असून ते थेट दुसऱ्या फेरीत खेळतील.मिश्र दुहेरी: १५ वी मानांकित भारतीय जोडी ध्रुव कपिला आणि तनिषा क्रास्टो यांनाही पहिल्या फेरीत बाय देण्यात आला आहे. महिला दुहेरी: महिला दुहेरीत भारताकडे एकही मानांकित जोडी नाही. मात्र, ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीकडून मोठ्या अपेक्षा आहेत. उल्लेखनीय म्हणजे, २०११ मध्ये अमानांकित असलेल्या ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा या जोडीने कांस्यपदक जिंकून इतिहास रचला होता.
भारतीय खेळाडूंचे पहिल्या फेरीतील प्रमुख सामने
प्रकार                  भारतीय खेळाडू                                     प्रतिस्पर्धी खेळाडू / देश
महिला एकेरी       पी. व्ही. सिंधू                                            सोफिया नोबल (आयर्लंड)
पुरुष एकेरी        लक्ष्य सेन कॉलिन्स                                      व्हॅलेंटाईन (ऑस्ट्रिया)
पुरुष एकेरी         आयुष शेट्टी                                              शी युकी (चीन)
पुरुष दुहेरी         सात्विकसाईराज / चिराग शेट्टी                    पहिली फेरी बाय
मिश्र दुहेरी          ध्रुव कपिला / तनिषा क्रास्टो                        पहिली फेरी बाय 

हेही वाचा
सर्व पहा