प्रतिनिधी गोवन वार्ता
पणजी : वाहतूक खात्याने वाहतूक नियम उल्लंघासाठी ई चलन स्वरूपात दिलेल्या दंडापैकी ३० जुलै २०२६ अखेरीस ५८.३३ कोटी रुपयांची रक्कम येणे बाकी आहे. १ जानेवारी २०२१ ते ३० जुलै २०२६ दरम्यान राज्यात वाहतूक नियम उल्लंघनाचे २९ लाखांहून अधिक ई चलन जारी करण्यात आले आहेत. ई चलन देण्यासह अन्य सेवा, चलन ऑनलाईन भरणे, तक्रार निवारण आदींसाठी केंद्रीय मोटार वाहन कायद्यात बदल करण्यात आले आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याने ही माहिती नुकतीच जारी केली आहे.
गोव्यात २०२१ मध्ये वाहतूक नियम उल्लंघनाचे ७.४८ लाख चलन जारी करण्यात आले होते. २०२१ अखेरीस ६.७४ लाख रुपये दंडाची रक्कम येणे बाकी होती. २०२२ मध्ये ५.०८ लाख चलन जारी करण्यात आले. २०२२ अखेरीस ६६.४६ लाख रुपये दंडाची रक्कम येणे बाकी होती. २०२३ मध्ये ५.५८ लाख चलन जारी करण्यात आले. त्या वर्षअखेरीस ३.१४ कोटी रुपये दंडाची रक्कम येणे बाकी होती. २०२४ मध्ये ५.१७ लाख चलन जारी करण्यात आले. वर्षअखेरीस ८.५४ कोटी रुपये दंडाची रक्कम येणे बाकी होती. २०२५ मध्ये वाहतूक नियम उल्लंघनाचे ३.५६ लाख ई चलन देण्यात आले. वर्षअखेरीस २३.१७ कोटी रुपये दंडाची रक्कम खात्याला येणे बाकी होती. १ जानेवारी ते ३० जुलै २०२६ दरम्यान राज्यात २.१० लाख चलन जारी करण्यात आले. ३० जुलै २०२६ अखेरीस ५८.३३ कोटी रुपये दंडाची रक्कम येणे बाकी होती.
३० जुलै २०२६ अखेरीस उत्तर प्रदेशमध्ये जारी करण्यात आलेल्या चलनांची सर्वाधिक २,२०२ कोटी रुपये दंड रक्कम येणे बाकी होती. दिल्ली येथील येणे बाकी असलेली रक्कम १,९४६ कोटी रुपये होती.
ई प्रणालीमुळे चालकांची सर्वसमावेशक नाेंद शक्य
नवीन नियमांनुसार चलन बजावणे, चलनांना ऑनलाईन आव्हान देणे, न्यायनिवाडा, भरणा, इलेक्ट्रॉनिक सूचना आणि भरणा न केल्यास होणारे परिणाम यासाठी कालमर्यादा ठरवून दिली आहे. ई-चलन प्रणाली वाहने आणि वाहन चालकांना जारी केलेल्या सर्व चलनांची एक सर्वसमावेशक नोंददेखील ठेवते. त्यामुळे त्यांच्या पूर्वीच्या गुन्हेगारी नोंदींच्या आधारे वारंवार गुन्हे करणाऱ्यांना ओळखणे आणि त्यांचा मागोवा घेणे शक्य होते, असे अहवालात म्हटले आहे.


