गोवा फॉरवर्डला स्वतंत्रपणे पुढे जावे लागेल: विजय सरदेसाई

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
40 mins ago
गोवा फॉरवर्डला स्वतंत्रपणे पुढे जावे लागेल: विजय सरदेसाई

पणजी: मला विरोधी पक्षांच्या बैठकीसाठी बोलावले होते की नाही, हा प्रश्न महत्त्वाचा नाही. सध्या राज्यात सरकारविरोधात एक भक्कम पर्याय उभा करणे गरजेचे आहे. यापूर्वी दोन वेळा गोव्यातील जनतेची फसवणूक झाली आहे. आता सत्ताधाऱ्यांची हॅट्रिक होईल अशी शंका जनतेच्या मनात निर्माण होऊ नये, यासाठी आम्हाला स्वतंत्रपणे काम करावे लागेल, अशी स्पष्ट प्रतिक्रिया आमदार विजय सरदेसाई यांनी दिली. बुधवारी पणजीत गोवा फॉरवर्ड पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.


सरदेसाई म्हणाले, विरोधी पक्षांची बैठक सुरू झाल्यानंतर मला याबाबत माहिती मिळाली. विरोधी पक्षनेत्यांनी मला मेसेज पाठवला होता की नाही, तो कोणत्या क्रमांकावर पाठवला होता, या गोष्टींना मी जास्त महत्त्व देत नाही. सध्या सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येणे किती महत्त्वाचे आहे, हे समजण्याइतपत राजकीय परिपक्वता सर्वांकडे असली पाहिजे. 'एसी' खोल्यांमध्ये बसून चर्चा करण्यापेक्षा रस्त्यावर उतरून काम करणे आवश्यक आहे. आम्ही आमच्या पक्षाची ताकद वाढवण्यासाठी आजपासूनच आवश्यक ते सर्व प्रयत्न करणार आहोत.




ते पुढे म्हणाले, युतीबाबत चर्चा करण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेऊन गिरीश चोडणकर यांच्या घरी गेलो होतो. तिथे सकारात्मक चर्चा सुरू झाली खरी, मात्र दुसऱ्याच दिवशी त्यात खंड पडला. त्यानंतर अनेकदा चर्चा सुरू झाली आणि पुन्हा थांबली; या सर्व अनिश्चिततेचा आता मला कंटाळा आला आहे. मी गेल्या साडेचार वर्षांत विरोधी पक्ष म्हणून प्रामाणिकपणे काम केले असून, नेहमीच इतर विरोधी पक्षांच्या सोबत राहिलो आहे. येत्या विधानसभा अधिवेशनातही मी विरोधी पक्ष म्हणूनच माझी ठाम भूमिका बजावणार आहे.



दरम्यान, पक्षाच्या राजकीय कामकाज समितीच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मोहनदास लोलयेकर यांनी सांगितले की, 'गेल्या काही दिवसांपासून आमचे अध्यक्ष विजय सरदेसाई हे युतीच्या चर्चेबाबत उत्सुक नाहीत, असा अपप्रचार जाणूनबुजून केला जात आहे. वास्तव पाहता, सर्व विरोधक एकत्र आले पाहिजेत, अशी भूमिका आमचा पक्षच गेल्या दोन वर्षांपासून मांडत आहे. मात्र, इतर विरोधकांकडून त्याला दरवेळी योग्य प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आम्ही आता युतीसंदर्भातील चर्चेला तूर्तास स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे.'






हेही वाचा
सर्व पहा