बोणबाग-बेतोडा येथे गव्याच्या धडकेत महिला जखमी

बोणबाग-बेतोडा आणि लगतच्या महामार्गावर गव्यांच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वारंवार होणाऱ्या भीषण अपघातांमध्ये जीवितहानी होत असल्याने वनखात्याने गव्यांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची तीव्र मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
9 mins ago
बोणबाग-बेतोडा येथे गव्याच्या धडकेत महिला जखमी

पणजी : फोंडा तालुक्यातील बोणबाग-बेतोडा, उसगाव आणि लगतच्या महामार्गांवर सध्या वन्यजीवांच्या, विशेषतः गव्यांच्या वाढत्या वावरामुळे स्थानिक नागरिक आणि वाहनधारकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. बोरी-बेतोडा मुख्य महामार्गावर अचानक गव्यांचा कळप समोर आल्याने दुचाकी घसरून गंभीर अपघात होण्याच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. या वाढत्या मानव-वन्यजीव संघर्षात आतापर्यंत दोघांना आपले प्राण गमवावे लागले असून, आज बुधवारी घडलेल्या घटनेत एक महिला गंभीर जखमी झाली आहे.



मागेच घडलेल्या एका दुर्दैवी घटनेत, फोंडा पोलीस ठाण्याचे ४८ वर्षीय होमगार्ड दिनेश तुळशीदास गावडे (रा. उडीवाडा, उसगाव) यांचा बायपास जंक्शनजवळ गव्याने पाठीमागून केलेल्या प्राणघातक हल्ल्यात मृत्यू झाला. आपल्या मित्राला भेटण्यासाठी दुचाकीवरून उतरून जात असताना ही घटना घडली. त्याचबरोबर, बोणबाग-बेतोडा येथील मंगल शांताराम गावडे या महिलेचाही गव्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यानंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला. यापूर्वीही याच परिसरात गव्याच्या हल्ल्यात एका महिलेचा जीव गेला होता.

महामार्गावरून प्रवास करताना अचानक समोर येणाऱ्या गव्यांमुळे दुचाकीस्वारांचे नियंत्रण सुटून अपघात होण्याचे सत्र सुरूच आहे. फोंडा तालुक्यातील मुख्य रस्त्यांवर गवे येण्याचे प्रमाण वाढल्याने रात्रीच्या वेळी प्रवास करणे अत्यंत धोक्याचे बनले आहे. या भागातील ही चौथी गंभीर घटना असल्याने नागरिकांचा संयम सुटत चालला आहे. वनखात्याने या प्रकरणी केवळ चौकशीचे सोपस्कार न करता, या गव्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी तीव्र मागणी आता जोर धरू लागली आहे. पर्यटनासाठी आणि स्थानिक वाहतुकीसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या या महामार्गावर वनविभागाने तातडीने उपाययोजना करून नागरिकांचे प्राण वाचवावेत, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.

हेही वाचा
सर्व पहा