मुसळधार पावसामुळे आंबोली धबधबा पर्यटकांसाठी तात्पुरता बंद

मुसळधार पावसामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आंबोली धबधबा पर्यटकांसाठी तात्पुरता बंद करण्यात आला आहे. दरम्यान, आंबोलीतील महादेवगड पॉईंटवर सुरक्षेचे रेलिंग ओलांडताना तोल गेल्याने निपाणी येथील डॉक्टरचा दरीत कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
2 hours ago
मुसळधार पावसामुळे आंबोली धबधबा पर्यटकांसाठी तात्पुरता बंद

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध पावसाळी पर्यटन स्थळ असलेला आंबोली धबधबा पर्यटकांसाठी तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आला आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार आणि मुसळधार पावसामुळे वनविभागाने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे.



सह्याद्री परिसरात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे आंबोली धबधब्याचा पाण्याचा प्रवाह अत्यंत वेगवान आणि रौद्र झाला आहे. मुसळधार पावसामुळे डोंगरमाथ्यावरून पाण्यासोबत लहान-मोठे दगड आणि माती वाहून येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. धबधब्याखाली भिजण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या जीवाला कोणताही धोका निर्माण होऊ नये, या दृष्टीने वनविभागाने खबरदारीची उपाययोजना म्हणून धबधब्याकडे जाणाऱ्या मार्गावर पूर्णपणे प्रवेशबंदी लागू केली आहे. वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, पावसाचा जोर ओसरल्यानंतर आणि परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर परिसराचा पुनराढावा घेतला जाईल. त्यानंतरच धबधबा पर्यटकांसाठी पूर्ववत खुला करण्याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे आंबोलीत वर्षा पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांनी प्रशासनाच्या नियमांचे तंतोतंत पालन करावे आणि धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे, असे स्पष्ट आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.




दरम्यान, आंबोली येथे वर्षा पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या कर्नाटकातील निपाणी येथील एका पर्यटकाचा दुर्दैवी अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. महादेवगड पॉईंटवरून सुमारे ४०० फूट खोल दरीत कोसळल्याने या पर्यटकाला आपला जीव गमवावा लागला. ही दुर्दैवी घटना मंगळवारी, ४ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. डॉ. आयुब सय्यद (वय ४५, रा. जत्राट, निपाणी, कर्नाटक) असे दरीत कोसळून मृत्यू झालेल्या पर्यटकाचे नाव आहे.



डॉ. सय्यद हे आपल्या नऊ सहकाऱ्यांसोबत मंगळवारी सकाळी आंबोली येथे पर्यटनासाठी आले होते. सायंकाळी पाचच्या सुमारास महादेवगड पॉईंट परिसरात फिरत असताना, ते लघुशंकेसाठी सुरक्षेचे लोखंडी रेलिंग ओलांडून दरीच्या टोकाला गेले. यादरम्यान अचानक पाय घसरून तोल गेल्याने ते थेट ४०० फूट खोल दरीत कोसळले. पॉईंटवरील एका स्थानिक मका विक्रेत्याने त्यांना दरीत कोसळताना पाहिले आणि तत्काळ त्यांच्या सहकाऱ्यांना व प्रशासनाला या घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले.

हेही वाचा
सर्व पहा