गोवन वार्ता प्रतिनिधी
पणजी : गेल्या काही वर्षांत राज्यातील कर्करोगाच्या रुग्णांत सातत्याने वाढ होत आहे. राज्यात २०२१ ते २०२५ दरम्यान कर्करोग झालेल्या ४,७६२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याचाच अर्थ महिन्याला सरासरी ७९, तर दिवसाला सरासरी दोनहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पाच वर्षांत कर्करोगामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ९.३४ टक्क्यांनी वाढली आहे. वरील कालावधीत संपूर्ण देशात कर्करोग झालेल्या ४१ लाखांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला. राष्ट्रीय कर्करोग नोंदणी प्रकल्पात ही आकडेवारी नोंदवण्यात आली आहे.
गोव्यात २०२१ मध्ये कर्करोग झालेल्या ९०९ रुग्णांचा मृत्यू झाला होता. २०२२ मध्ये ९३२, २०२३ मध्ये ९५०, २०२४ मध्ये ९७७, तर २०२५ मध्ये ९९४ रुग्णांचा मृत्यू झाला होता. वरील कालावधीत संपूर्ण देशात कर्करोग झालेल्या वर्षाला सरासरी ८.२८ लाख रुग्णांचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगालमध्ये रुग्णांच्या मृत्यूची संख्या तुलनेने अधिक होती. मणिपूर, नागालँड, अरुणाचल प्रदेश, मेघालय येथे मृत्यूची संख्या तुलनेने कमी होती.
वरील कालावधीत राज्यात कर्करोगाचे एकूण ८,६८७ रुग्ण आढळले होते. याचाच अर्थ महिन्याला सरासरी १४४, तर दिवसाला सरासरी ४ हून अधिक रुग्ण आढळले होते. पाच वर्षात कर्करोगी रुग्णांची संख्या ९.९८ टक्क्यांनी वाढली आहे. वरील कालावधीत संपूर्ण देशात कर्करोगाचे ७५ लाखांहून अधिक रुग्ण आढळले होते. राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण प्रकल्पाअंतर्गत केंद्र सरकारतर्फे सर्व राज्य सरकारना तांत्रिक आणि आर्थिक मदत केली जाते. यानुसार देशभरात कर्करोग रुग्णांसाठी ५२४ केंद्र सुरू करण्यात आली आहेत.
कर्करोगाची शक्यता
जागतिक आरोग्य संघटनेच्या एका कर्करोगावरील जागतिक अहवालानुसार, भारतात दर दहा व्यक्तींमध्ये एकाला वयाच्या ७५ वर्षांच्या आधी कर्करोग होण्याची शक्यता आहे. भारतात दरवर्षी कर्करोगामुळे ९.२ लाख रुग्णांचा मृत्यू होतो.


