गंभीर गुन्ह्यांचा छडा लावण्यात गोवा पोलिसांना ९४.४४ टक्के यश

राज्यात १ जानेवारी ते २६ जुलै या सुमारे ७ महिन्यांच्या कालावधीत एकूण १,३२७ गुन्ह्यांची नोंद झाली. त्यातील १,०५९ गुन्ह्यांतील संशयितांना अटक झाली आहे.


03rd August, 10:36 pm
गंभीर गुन्ह्यांचा छडा लावण्यात गोवा पोलिसांना ९४.४४ टक्के यश

गोवन वार्ता प्रतिनिधी
पणजी : राज्यात १ जानेवारी ते २६ जुलै या सुमारे ७ महिन्यांच्या कालावधीत खून, बलात्कार, प्राणघातक हल्ला, दरोडा, जबरी चोरी, अशा गंभीर गुन्ह्यांचा छडा लावण्यात गोवा पोलिसांना ९४.४४ टक्के यश आले. वरील काळात राज्यात ६४ बलात्कार, तर २१ खुनाचे गुन्हे नोंद झाले. त्यापैकी एक खुनाचा आणि चार बलात्काराचा गुन्ह्याचा तपास लागलेला नाही. याशिवाय चोरी, वाहन चोरी, फसवणूक व इतर भारतीय दंड संहिता (भा.दं.सं.) आणि भारतीय न्याय संहितेच्या (भा.न्या.सं.) विविध कलमांखाली नोंद झालेल्या गुन्ह्यांच्या तपासाची टक्केवारी ७९.८० अाहे.
राज्यात २१ खून, ६४ बलात्कार, २५ जीवे मारण्याचा प्रयत्न, ८ सदोष मनुष्यवध, ८ जबरी चोरी असे एकूण १२६ गंभीर गुन्हे नोंद झाले. त्यातील चार बलात्कार, तसेच खून, जीवे मारण्याचा प्रयत्न, सदोष मनुष्यवध आणि जबरी चोरीचे प्रत्येकी एका गुन्ह्यातील संशयितांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलेले नाही. याशिवाय घरफोडी, सोनसाखळी, मोबाईल चोरी, वाहन चोरी व इतर चोरीचे मिळून २६८ गुन्हे दाखल झाले. त्यातील १६१ (६०.०७ टक्के) प्रकरणांचा तपास पूर्ण झाला. वरील कालावधीत ५८ घरे फोडण्यात आली, त्यातील ३४ प्रकरणांचा छडा लागला. १२ सोनसाखळ्या लांबवण्यात आल्या, त्यांतील ७ प्रकरणांचा छडा लागला. याशिवाय मोबाईल चोरी, वाहन चोरी व इतर चोरीचे १९८ पैकी १२० प्रकरणांचा छडा लागला आहे.
फसवणुकीच्या १९३ पैकी ८७, विश्वासघात १९ पैकी १७, अपहरण ५९ पैकी ४९, मारामारी १०१ पैकी ९८ गुन्ह्यांतील संशयितांना अटक करण्यात आली आहे. अपघाती मृत्यू ८२ पैकी ८०, इतर अपघात १८१ पैकी १७७ गुन्ह्यांतील संशयितांना अटक झाली आहे. भारतीय दंड संहिता आणि भारतीय न्याय संहितेच्या इतर २९८ पैकी २७१ गुन्ह्यांचा तपास पूर्ण झाला आहे. राज्यात एकूण १,३२७ गुन्ह्यांची नोंद झाली. त्यातील १,०५९ गुन्ह्यांतील संशयितांना अटक झाली आहे. त्यामुळे ही टक्केवारी ७९.८० एवढी आहे.

हेही वाचा
सर्व पहा