गोवन वार्ता प्रतिनिधी
पणजी : आता १६ वर्षे पूर्ण केलेल्या कोणालाही थेट दहावीच्या परीक्षेला बसण्याची संधी मिळणार आहे. यासाठी किमान शैक्षणिक पात्रतेची कोणतीही अट असणार नाही. लेखी परीक्षेत कमी गुण मिळाले तरी प्रात्यक्षिक परीक्षेतील कामगिरीच्या आधारे उमेदवाराला उत्तीर्ण होता येणार आहे. सरकारी किंवा खासगी नोकरीत असलेल्या कामगार-कर्मचाऱ्यांसाठी दहावी उत्तीर्ण होण्याची ही मोठी संधी ठरणार आहे. लेखी परीक्षेपेक्षा कौशल्य किंवा प्रात्यक्षिक परीक्षेला अधिक गुण असल्याने प्रत्यक्ष ज्ञान असलेल्या उमेदवारांना परीक्षा उत्तीर्ण होणे सोपे जाणार आहे.
शालान्त मंडळाच्या सूत्रांकडून ही माहिती मिळाली. थेट दहावीच्या परीक्षेसाठी यापूर्वीच्या योजनेत लेखी परीक्षेला अधिक गुण होते. त्यामुळे शाळा सोडून अनेक वर्षे झालेल्या व्यक्तींना परीक्षा उत्तीर्ण होणे कठीण जात होते. यामुळे गोवा शालान्त मंडळाने आता थेट दहावीची परीक्षा देण्यासाठी नवी योजना तयार केली आहे. गोव्यातील अनेक जण मोठा खर्च करून परराज्यांतील मंडळांच्या माध्यमातून दहावीची परीक्षा देत होते. गोवा शालान्त मंडळाची दहावीची परीक्षा तुलनेने कठीण असल्याने परराज्यांतील मंडळांच्या परीक्षांना पसंती दिली जात होती. यात सरकारी तसेच खासगी नोकरी करणाऱ्या कामगार-कर्मचाऱ्यांचा मोठा समावेश होता. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर पदोन्नती मिळण्याची शक्यता असल्याने अनेक कर्मचारी थेट दहावीची परीक्षा देत होते. गोव्यातील अनेक जण हजारो रुपये खर्च करून परराज्यांतील मंडळांच्या परीक्षा देतात. ही बाब लक्षात घेऊन गोवा शालान्त मंडळाची थेट दहावीची परीक्षा अधिक सुलभ व्हावी, यासाठी नवी योजना तयार करण्यात आली आहे.
दहावी थेट परीक्षेची अशी आहे नवी योजना...
कोणतीही शैक्षणिक पात्रतेची अट असणार नाही. शाळेत न गेलेल्या व्यक्तीलाही थेट दहावीची परीक्षा देता येणार आहे. मात्र, उमेदवाराचे वय किमान १६ वर्षे असणे आवश्यक आहे.
उमेदवाराला कोणत्याही सहा विषयांची निवड करावी लागणार आहे. यात तीन भाषा, गणित, विज्ञान, समाजशास्त्र यांच्यासह संगीत, चित्रकला आदी विषयांचा समावेश असेल. प्रत्येक विषयासाठी १०० गुण असतील. त्यापैकी ३० गुणांची लेखी परीक्षा, तर ७० गुणांची प्रात्यक्षिक परीक्षा असेल.
उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक विषयात किमान ३३ गुण मिळवणे आवश्यक आहे. एखाद्या उमेदवाराला प्रात्यक्षिक परीक्षेत ३३ गुण मिळाले आणि लेखी परीक्षेत एकही गुण मिळाला नाही, तरी तो त्या विषयात उत्तीर्ण होऊ शकतो. लेखी परीक्षेत किमान गुणांची स्वतंत्र अट असणार नाही.
प्रात्यक्षिक परीक्षा असाइनमेंटच्या स्वरूपातही घेण्यात येणार आहे. या उमेदवारांसाठी काही विशेष शाळांची नोंदणी केली जाईल. संबंधित शाळांमध्ये उमेदवारांना असाइनमेंट किंवा प्रात्यक्षिक परीक्षा द्यावी लागेल.
भाषेच्या विषयांचा विचार केल्यास संबंधित भाषा बोलता, वाचता आणि लिहिता येत असल्यास प्रात्यक्षिक परीक्षेत त्याला गुण मिळतील. नोंदणीकृत शाळांमध्ये उमेदवारांना मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
आयटीआयच्या विषयांचाही पर्याय
आयटीआयमध्ये दहावीची शैक्षणिक पात्रता नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्लंबिंग तसेच इतर अभ्यासक्रम असतात. यातील तीन विषय निवडण्याचा पर्याय उमेदवारांना असेल. हे तीन विषय घेतल्यास दहावीच्या सहा विषयांपैकी तीन विषय घेतल्याचे ग्राह्य धरले जाईल. आयटीआयचे विषय निवडल्यास गणित आणि विज्ञान हे विषय घेणे ऐच्छिक असेल.
अकरावी प्रवेशाचीही संधी
दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर अकरावीमध्ये प्रवेश घेता येणार आहे. विज्ञान शाखेत प्रवेश घेण्यासाठी दहावीत गणित आणि विज्ञान हे विषय घेणे आवश्यक असेल. इतर शाखांसाठी गणित आणि विज्ञान घेण्याची सक्ती असणार नाही. दहावीची थेट परीक्षा वर्षातून दोन वेळा, डिसेंबर आणि मे महिन्यात घेतली जाणार आहे.


