गोवन वार्ता प्रतिनिधी
पणजी : आरोग्य संचालनालयात मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. मेधा साळकर या आरोग्य खात्याच्या नव्या संचालक असतील. डॉ. रूपा नाईक निवृत्त झाल्याने शनिवार, १ ऑगस्टपासून आरोग्य खात्याच्या संचालकपदाचा ताबा डॉ. मेधा साळकर यांच्याकडे असेल. यासंदर्भातील आदेश सरकारने जारी केला आहे.
डॉ. मेधा साळकर १९९२ मध्ये आरोग्य खात्यात वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवेत रुजू झाल्या. डिचोली येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असताना डायलिसिस विभाग सुरू करण्यासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले. याशिवाय कोविड काळात डिचोली कोविड केअर सेंटरची स्थापना त्यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. वैद्यकीय सेवा बजावत असतानाच त्यांनी सामाजिक कार्यातही सहभाग घेतला. कर्करोग तपासणी तसेच अन्य आरोग्यविषयक शिबिरांच्या आयोजनात त्यांनी मोलाचे योगदान दिले.


