CJPच्या उदंड यशानंतर Gen-Z सादर करत आहे Reservation Hatao Movement आणि E20 Janata Party!

'कॉक्रोच इफेक्ट'नंतर आता सोशल मीडियावर 'आरक्षण हटाव आंदोलन' (RHA) सह अनेक नवीन मुद्दा-आधारित मोर्चे आणि डिजिटल पक्ष वेगाने लोकप्रिय होत आहेत. ५८ लाखांहून अधिक फॉलोअर्ससह ही नवी तरुण पिढीची चळवळ काय सांगू पाहत आहे? E20 पेट्रोल असो वा आरक्षणाचा मुद्दा, आजचा तरुण थेट प्रश्न विचारतोय.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
29th July, 12:52 pm
CJPच्या उदंड यशानंतर Gen-Z सादर करत आहे Reservation Hatao Movement आणि E20 Janata Party!

पणजी : भारताच्या राजकारणात आणि समाजमाध्यमांवर सध्या 'कॉक्रोच इफेक्ट'ची प्रचंड चर्चा सुरू आहे. काही महिन्यांपूर्वी अभिजीत दिपके यांनी स्थापन केलेल्या 'कॉक्रोच जनता पार्टी' (सीजेपी) या अनोख्या पक्षाने देशातील तरुण पिढीला शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींवर आवाज उठवण्यास भाग पाडले. यानंतर जंतरमंतरवरील झालेल्या तीव्र आंदोलनाच्या अंती एका केंद्रीय मंत्र्याला राजीनामा देण्यास भाग पाडले होते. या घटनेने हे पुन्हा सिद्ध केले की जर मुद्दा अस्सल आणि खरा असेल, तर राजकीय विडंबन किंवा सॅटायर हे देखील एक प्रभावी राजकीय हत्यार बनू शकते. कॉक्रोज जनता पार्टीच्या या अभूतपूर्व यशानंतर आता देशात अनेक अनुकरणवादी आणि मुद्दा-आधारित ऑनलाइन मोहिमांचा पूर आला आहे. सोशल मीडियावर मिनिटागणिक अशा नवीन चळवळी आणि डिजिटल पक्ष उभे राहत असून ते वेगाने लोकप्रिय देखील होत आहेत.



या नवनवीन ऑनलाइन मोहिमांमध्ये सर्वच पक्ष किंवा चळवळी गंभीर सामाजिक मुद्द्यांवर आधारित नाहीत. काही संघटना पूर्णपणे विनोदी आणि विडंबनात्मक स्वरूपाच्या आहेत, जसे की 'दारू जनता पार्टी' आणि 'कबुतर जनता पार्टी'. मात्र, यासोबतच काही गंभीर विषयांना हात घालणाऱ्या चळवळींनीही तरुणांचे लक्ष वेधून घेतले आहे. यामध्ये 'ई२० जनता पार्टी'चा प्रामुख्याने समावेश होतो, जी पेट्रोलमधील इथेनॉल मिश्रणाबाबत वाहनधारकांमध्ये वाढत चाललेल्या रोषाला वाचा फोडत आहे. परंतु, या सर्व नवउद्यामी डिजिटल चळवळींमध्ये सध्या इन्स्टाग्रामवर सर्वाधिक प्रभाव गाजवणारी आणि सर्वात मोठी ठरलेली चळवळ म्हणजे 'आरक्षण हटाव आंदोलन' (आरएचए) ही आहे.


Reservation Hatao Andolan


नावाप्रमाणेच या आंदोलनाची मुख्य मागणी जातनिहाय आरक्षण आणि जात जनगणना पूर्णपणे बंद करण्याची आहे. गेल्या आठवड्यात जेव्हा सीजेपीच्या नेतृत्वाखालील विद्यार्थी आंदोलने देशभरात तीव्र झाली होती, तेव्हाच 'आरक्षण हटाव आंदोलन' डिजिटल जगतात अत्यंत वेगाने लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचत होते. सध्या या इन्स्टाग्राम अकाउंटचे ५८ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. विशेष म्हणजे ही संख्या तृणमूल काँग्रेस आणि समाजवादी पार्टीसारख्या मुरब्बी राजकीय पक्षांच्या सोशल मीडिया फॉलोअर्सपेक्षाही कैक पटीने जास्त आहे. एक्स प्लॅटफॉर्मवरही या आंदोलनाचे २० हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तुलनेने पाहिले तर, सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाचे इन्स्टाग्रामवर ९६ लाख आणि काँग्रेसचे १ कोटी ४९ लाख फॉलोअर्स आहेत. यावरून या डिजिटल आंदोलनाचा आवाका किती मोठा होत चालला आहे, याची कल्पना येते.


Explained: Why Congress Is Promising To Remove 50% Reservation Cap Imposed  By SC | Outlook India


कॉक्रोज जनता पार्टीच्या यशाच्या पावलांवर पाऊल ठेवून 'आरक्षण हटाव आंदोलन'ने जातनिहाय भेदभावाला मूठमाती देण्याचा आणि सर्व नागरिकांना समान अधिकार मिळवून देण्याचा विडा उचलला आहे. या इन्स्टाग्राम हँडलवर आतापर्यंत १२५ हून अधिक पोस्ट शेअर करण्यात आल्या आहेत आणि विशेष म्हणजे हे पेज केवळ एकाच अकाउंटला फॉलो करते, ते म्हणजे भारतीय सेना. या खात्याच्या इन्स्टाग्राम बायोमध्ये प्रसिद्ध कवी रामधारी सिंह दिनकर यांच्या ओळींचा उल्लेख करण्यात आला आहे. "सामर्थ्य और सौजन्य का संबंध केवल पशुता से है," अशा अर्थाच्या ओळींमधून गुणवत्तेवर भर देण्याचे आवाहन केले गेले आहे. विशेष म्हणजे, जातनिहाय आरक्षणाचा विरोध करत असतानाही या आंदोलनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा 'शिका, संघर्षा करा आणि संघटित व्हा' हा प्रसिद्ध नारा आपल्या प्रचारासाठी वापरला आहे. तसेच 'समानता, गुणवत्ता आणि न्याय' हे त्यांचे मुख्य ब्रीदवाक्य बनवण्यात आले आहे.


Caste-Based Reservation


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९४२ मध्ये नागपूर येथे अखिल भारतीय शोषित वर्ग परिषदेमध्ये जातीपातीचे उच्चाटन करण्यासाठी जनआंदोलनाची हाक देताना हाच नारा दिला होता. सध्याच्या या 'आरक्षण हटाव आंदोलन'च्या मागे नेमके कोण आहे, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र, ही पूर्णपणे नागरिकांच्या सहभागातून उभी राहिलेली चळवळ असून हिचा कोणताही थेट राजकीय पक्षाशी संबंध नाही, असे स्पष्ट केले गेले आहे. एका पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, त्यांचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही. त्यांना एकेकाळी वाटले होते की सत्तेतील बदलामुळे आरक्षण व्यवस्थेत मोठे बदल घडतील, परंतु भारतीय जनता पक्षालाही यात अपयश आले, असा दावा या खात्याद्वारे केला जात आहे.


Remove Reservation | Allahabad.

आरएचएमच्या मते, भविष्यात केवळ चारच घटकांसाठी आरक्षण असावे, ज्यामध्ये विशेष सक्षम (दिव्यांग), प्रत्येक अनाथ मूल, देशासाठी शहीद झालेल्या जवानाचे अपत्य आणि जात-धर्माचा विचार न करता आर्थिक निकषांवर आधारित प्रत्येक गरीब व्यक्तीचा समावेश असावा. सध्या देशात आरक्षणाची मर्यादा ५० टक्के ठरवण्यात आली आहे, जरी विविध राजकीय पक्षांकडून ती वाढवण्याची मागणी सातत्याने होत असते. या आंदोलनाने सरकारला स्पष्ट संदेश दिला आहे की, जात ओळखण्याच्या प्रथेला आता पूर्णविराम मिळाला पाहिजे. कोणीही व्यक्ती स्वतःची ओळख ब्राह्मण, जाट, गुर्जर, अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती म्हणून करू नये, असे त्यांचे म्हणणे आहे. नागरिकांना कोणत्याही सरकारी अर्जात किंवा शैक्षणिक व रोजगार अर्जात आपली जात नमूद करावी लागू नये, ही या चळवळीची प्रमुख मागणी आहे.



या आंदोलनाचा दीर्घकालीन उद्देश 'एक देश, एक ओळख' असा आहे. हा प्रश्न केवळ पक्षीय राजकारणापुरता मर्यादित ठेवता येणार नाही, असे या आंदोलनाचे चालक मानतात. या चळवळीच्या प्रभावामुळे इतरही अनेक विरोधी मोर्चे उघडे झाले आहेत. यामध्ये 'जनरल जनता पार्टी' आणि 'अँटी-रिजर्वेशन जनता पार्टी' यांसारख्या संघटनांचा जन्म झाला आहे. काही संघटनांचे म्हणणे आहे की मूळ समस्या आरक्षण नसून जातीवाद आहे. 'कास्टिझम हटाव मुव्हमेंट' या संघटनेचे इन्स्टाग्रामवर दोन लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत आणि त्यांचे मत आहे की जातीवाद आहे म्हणून आरक्षण आहे, त्यामुळे आधी जातीवाद संपवणे गरजेचे आहे.


INDIA AGAINST RESERVATION SYSTEM | changeindia2016


दुसरीकडे, पेपरफुटीच्या घटनांसोबतच अलीकडच्या काळात सरकारचे 'ई२० पेट्रोल' धोरणही मोठ्या वादात सापडले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या या धोरणामुळे वाहनांचे मायलेज कमी होत असल्याचा आणि वाहनांचे पार्टस लवकर खराब होत असल्याचा गंभीर आरोप वाहनचालकांनी केला आहे. या असंतोषाचे कॅशईन करून 'ई२० पेट्रोल जनता पार्टी'ने उडी घेतली असून इन्स्टाग्रामवर त्यांना जवळपास २ लाख ८० हजार फॉलोअर्स मिळाले आहेत. या आंदोलनाने सरकारकडे मागणी केली आहे कि ग्राहकांना ई२० इंधनासोबतच १०० टक्के शुद्ध आणि अनब्लेंडेड पेट्रोल खरेदी करण्याचा पर्याय देखील उपलब्ध करून दिला जावा.


कारों पर एक्सपेरिमेंट नहीं 100% पेट्रोल चाहिए', CJP के बाद अब मैदान में E20  जनता पार्टी - After Cockroach Janta Party CJP now E20 Janta Party demands  choice Ethanol Free 100 petrol auaw - AajTak


कॉक्रोज जनता पार्टी केवळ तरुण पिढीलाच नव्हे तर समाजातील प्रत्येक घटकाला जोडण्यात यशस्वी ठरली, याचे कारण म्हणजे शिक्षण व्यवस्थेतील अनियमिततेमुळे लोकांच्या मनात दडलेला रोष तिने उजेडात आणला. यामुळेच सीजेपीचा संदेश सोशल मीडियाच्या पलीकडे जाऊन मुख्य प्रवाहात पोहोचला. आता 'आरक्षण हटाव आंदोलन' आणि इतर मुद्द्यांवर आधारित या नवीन डिजिटल चळवळी भारतीय राजकारणात काही मोठा बदल घडवून आणण्यात यशस्वी ठरणार की काही दिवसांत विरघळून जाणार, हे आगामी काळच ठरवणार आहे.


हेही वाचा
सर्व पहा