वीरेश यांच्या विधिमंडळातील अधिकारांवर परिणाम नाही

पक्षाच्या नेतृत्वावरून संभ्रम : अंतर्गत वादानंतरही विधानसभेत पद सुरक्षित

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
29th July, 10:33 pm
वीरेश यांच्या विधिमंडळातील अधिकारांवर परिणाम नाही

रिव्हॉल्युशनरी गोवन्स (आरजी) पक्षातील अंतर्गत वादामुळे पक्षाच्या नेतृत्वाबाबत संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. मात्र, वीरेश बोरकर हे पक्षाचे एकमेव आमदार असल्याने ते पक्षात राहोत अथवा न राहोत, त्यांच्या आमदारकीवर किंवा विधानसभेतील अधिकारांवर त्याचा कोणताही परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

पक्षाच्या नेतृत्वावरून कायदेशीर वाद

सांत आंद्रेचे आमदार वीरेश बोरकर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. कारणे दाखवा नोटीस बजावल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. मात्र, आपणच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचा दावा वीरेश बोरकर यांनी केला आहे. विश्वेश नाईक आणि अजय खोलकर यांना यापूर्वीच निलंबित करण्यात आले असून, निलंबित सदस्यांना आपल्याविरुद्ध कारवाई करण्याचा अधिकार नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे पक्षाचे अधिकृत नेतृत्व कोणाकडे आहे, हा आता कायदेशीर वादाचा विषय ठरला आहे.

आमदारकीवर कोणताही परिणाम नाहीवीरेश बोरकर यांच्या हकालपट्टीची अधिकृत माहिती अद्याप गोवा विधिमंडळ सचिवालयाला प्राप्त झालेली नाही. पक्षातून हकालपट्टी झाली तरी त्यांचे आमदारपद कायम राहणार असून सदस्यत्व रद्द होणार नाही. मात्र, त्यांनी स्वतःहून पक्षाचा राजीनामा दिल्यास त्यांच्या आमदारकीवर परिणाम होऊ शकतो. सध्या त्यांनी पक्षाचा राजीनामा दिलेला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
विधिमंडळातील भूमिकेवर पक्षाचे नियंत्रण शक्य नाही

वीरेश बोरकर हे आरजी पक्षाचे विधानसभेतील एकमेव आमदार असल्याने सरकारला पाठिंबा द्यायचा की विरोधात राहायचे, याचा निर्णय ते स्वतः घेऊ शकतात. पक्षाचा 'व्हीप' लागू करणे किंवा त्याचे पालन करण्याचा प्रश्नही अशा परिस्थितीत वेगळा ठरतो. पक्षाचे दोन किंवा अधिक आमदार असते तर परिस्थिती वेगळी असती. मात्र, एकमेव आमदार असल्याने त्यांच्या विधिमंडळातील भूमिकेवर पक्षाचे नियंत्रण ठेवणे शक्य नसल्याचे मत घटनातज्ज्ञ अॅड. क्लीओफात कुतिन्हो यांनी व्यक्त केले.

स्वतंत्र निर्णय घेण्याचा अधिकार

स्वतःला पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष मानत असल्याने पक्षासंदर्भातील निर्णय घेण्याचा अधिकार असल्याचा दावा वीरेश बोरकर यांनी केला आहे. त्यामुळे पक्षाशी सल्लामसलत न करता विधानसभेतील कामकाजात स्वतंत्र भूमिका घेणे किंवा मतदान करणे त्यांना शक्य आहे. गोवा विधानसभेच्या इतिहासात एकमेव आमदारांनी पक्षाच्या निर्देशांपासून स्वतंत्र भूमिका घेतल्याची उदाहरणे यापूर्वीही पाहायला मिळाल्याचे घटनातज्ज्ञ अॅड. क्लीओफात कुतिन्हो यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा
सर्व पहा