पणजी :गोव्यात गेल्या काही वर्षांपासून डिजिटल पेमेंटचा वापर झपाट्याने वाढत असून, नागरिक रोख रकमेऐवजी ऑनलाइन व्यवहारांना अधिक प्राधान्य देत आहेत. याच बदलत्या प्रवृत्तीचा परिणाम म्हणून गेल्या दोन वर्षांत राज्यातील विविध बँकांची ४६ एटीएम (४.३२ टक्के) कायमची बंद झाली आहेत. त्याचवेळी यूपीआयद्वारे होणाऱ्या व्यवहारांमध्ये तब्बल ३७ टक्क्यांची वाढ झाल्याची माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) ताज्या अहवालातून समोर आली आहे.
दोन वर्षांत ४६ एटीएम बंद
आरबीआयच्या अहवालानुसार, ३० जून २०२४ अखेरीस गोव्यात विविध बँकांची एकूण १,०५७ एटीएम कार्यरत होती. त्यामध्ये उत्तर गोव्यात ५२७ आणि दक्षिण गोव्यात ५३० एटीएमचा समावेश होता. ३० जून २०२५ पर्यंत ही संख्या १,०३९ वर आली, तर ३० जून २०२६ अखेरीस ती आणखी घटून १,०११ झाली आहे. सध्या उत्तर गोव्यात ५२२, दक्षिण गोव्यात ४०९ आणि कुशावती जिल्ह्यात ८० एटीएम कार्यरत आहेत.
या दोन वर्षांत खासगी बँका, लघु वित्त बँका (स्मॉल फायनान्स बँक) आणि अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकांच्या एटीएममध्ये सर्वाधिक घट झाली आहे. खासगी बँकांची एटीएम संख्या ३८६ वरून ३५८ झाली, तर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकांची एटीएम संख्या २३ वरून ११ पर्यंत घसरली आहे. लघु वित्त बँकांची एटीएम संख्या १८ वरून ११ इतकी कमी झाली आहे.
डिजिटल पेमेंटचा स्वीकार वाढत असल्याचे यूपीआय व्यवहारांच्या आकडेवारीतून स्पष्ट होते. जून २०२४ मध्ये राज्यात यूपीआयद्वारे ४,०२०.१८ कोटी रुपयांचे व्यवहार झाले होते. जून २०२५ मध्ये हा आकडा ४,०५३.६८ कोटी रुपयांवर पोहोचला. तर ३० जून २०२६ अखेरीस गोव्यात यूपीआय व्यवहारांची एकूण रक्कम तब्बल ५,४८५.३४ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. भीम, गुगल पे, पेटीएम तसेच विविध बँकांच्या मोबाईल अॅपचा नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे.


