साप्ताहिकी - या आठवड्यात घडलेल्या ठळक घडामोडी

कामुर्ली ग्रामसभेत मेगा प्रकल्पांना विरोध; वीज खात्यातील १३ जणांचे निलंबन

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
9 mins ago
साप्ताहिकी - या आठवड्यात घडलेल्या ठळक घडामोडी

पणजी : कामुर्ली ग्रामसभेत ग्रामस्थांकडून मेगा प्रकल्पांना विरोध करण्यात आला. विजेचा शॉक लागून लाईनमनचा झालेला मृत्यू, तसेच अन्य अपघातांप्रकरणी वीज खात्यातील ६ अभियंते आणि ७ लाईन स्टाफच्या निलंबनाचे आदेश जारी करण्यात आले आहेत. उगवे येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर झालेल्या भीषण अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली असून, तिघेजण जखमी झाले. याशिवाय फसवणूक, चोरीच्या घटना घडल्या आहेत. या आठवड्यातील घडामोडींचा घेतलेला आढावा.

रविवार

कामुर्ली ग्रामसभेत मेगा प्रकल्पांना विरोध

कामुर्ली ग्रामसभेत नगर नियोजन कायद्याच्या कलम ‘३९ अ’अंतर्गत आलेला प्रस्ताव फेटाळण्यात आला. आवश्यक रस्ता व इतर अटी पूर्ण होत नसल्याने, तसेच एफएआर वाढवून ग्राउंडसह चार मजली प्रकल्पाला परवानगी देऊ नये, असे ग्रामस्थांनी सांगितले. यापुढेही मेगा प्रकल्पांना परवानगी देऊ नये, असा ठराव घेण्यात आला.


आझाद मैदानावर निदर्शने

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी शनिवारी आझाद मैदानावर झालेल्या सभेत उमर खालिदला समर्थन देणारे फलक झळकल्याचा तरुणांनी रविवारी निषेध केला. ‘फ्री उमर खालिद’ असे फलक सभेत दाखविण्यात आल्याबद्दल आक्षेप घेऊन नीट प्रश्नपत्रिका फुटीविरोधातील आंदोलनात तरुणांचा वापर करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

शेअर ट्रेडिंगमध्ये जास्त मोबदल्याने २३.५० लाख रुपयांचा गंडा

शेअर ट्रेडिंगमध्ये भरघोस परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत बार्देश तालुक्यातील एका ४५ वर्षीय नागरिकाची २३.५० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी सायबर गुन्हे विभागाने अज्ञात व्हॉट्सअॅपधारकाविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

सोमवार 


आमदार वीरेश बोरकर यांची आरजीपीतून हकालपट्टी

रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षाने (आरजीपी) पक्षाचे आमदार वीरेश बोरकर यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. शिस्तभंगाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला असून, त्यांचे प्राथमिक सदस्यत्व रद्द केल्याचे पत्र पक्षाने ई-मेलद्वारे पाठविले आहे. पक्षाचे सरचिटणीस विश्वेश नाईक यांनी बोरकर यांच्या हकालपट्टीचा आदेश जारी केला.

पणजीत ‘कोटपा’ उल्लंघनप्रकरणी ४ कॅसिनोंना दंड

तिसवाडी तालुका पथकाने सोमवारी सिगरेट आणि तंबाखूजन्य पदार्थ विरोधी कायदा (कोटपा) अंतर्गत पणजीतील विविध कॅसिनोंवर कारवाई करत नियमभंगाची सहा प्रकरणे नोंदवली. कलम ४ चे उल्लंघन केल्याप्रकरणी चार कॅसिनोंना सहा चलने बजावून एकूण १,२०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

धारगळ येथे २०५ ग्रॅम गांजासह एकास अटक

धारगळ येथील मोपा विमानतळ लिंक रस्त्यावरील अंडरपास परिसरात पेडणे पोलिसांनी अमली पदार्थांविरोधात कारवाई करत २०५ ग्रॅम गांजा जप्त केला असून, एका तरुणाला अटक केली आहे.

मोरजीतील पिता-पुत्राची याचिका न्यायालयाने फेटाळली

मोरजी येथील अॅड. अंकुर कुमार यांच्यावरील प्राणघातक हल्लाप्रकरणात संशयित दिलीप मोरजे आणि त्यांचा मुलगा ध्रुव मोरजे यांनी बेकायदेशीर अटकेचा दावा करत गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळून लावली. न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर हा निर्णय दिला.

मंगळवार

पश्चिम घाट जैवसंवेदनशील क्षेत्रात गोव्यातील १०८ गावे

केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने पश्चिम घाट ‘पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र’ (ईएसए) घोषित करण्याबाबत नव्याने सातवी मसुदा अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या अधिसूचनेनुसार गोव्यातील १,४६१ चौ. किमी क्षेत्रातील १०८ गावांचा जैव संवेदनशील क्षेत्रात समावेश करण्यात आला आहे.

गोव्यासह १५ राज्यांच्या मुख्य सचिवांना नोटीस

हाताने गटार आणि सेप्टिक टँक साफ करताना होणारे मृत्यू थांबवण्यात आलेल्या अपयशाबद्दल सर्वोच्च न्यायालयाने गोव्यासह १५ राज्यांच्या मुख्य सचिवांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस बजावली आहे. २०२३ मध्ये दिलेल्या स्पष्ट आदेशांचे उल्लंघन होत असल्याबद्दल न्यायालयाने तीव्र असंतोष व्यक्त करून संबंधित राज्यांना चार आठवड्यांत उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.

‘डिजिटल अरेस्ट’द्वारे ६४ लाखांना गंडविणाऱ्यास आसाममधून अटक

केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि मुंबई पोलिसांचे अधिकारी असल्याचे भासवत दक्षिण गोव्यातील एका महिलेला ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून तब्बल ६४ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. या प्रकरणी सायबर विभागाने आसाममधून देवजित दास या संशयिताला अटक केली असून, न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

बुधवार

दोनापावला येथील दरोडाप्रकरणी आरोपपत्र दाखल

दोनापावला येथील प्रसिद्ध उद्योगपतीच्या बंगल्यात पडलेल्या दरोड्या प्रकरणी गुन्हा शाखेने चार बांगलादेशी नागरिकांसह एका स्थानिक साथीदाराविरोधात पणजी येथील प्रथमवर्ग न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. त्यात संशयित नूर इस्लाम उर्फ नदीम खान, मोहम्मद सैफुल इस्लाम, सोहेल खान, मोहम्मद सुमन हवालदार उर्फ बाबू या चार बांगलादेशी नागरिकासह कळंगुट येथे राहणारा महमूद याकूब याचा समावेश आहे.

प्राध्यापकासह तिघांना ७९.४६ कोटींचा गंडा

विदेश दौऱ्यांचे आयोजन आणि व्यवसायाचा विस्तार करण्याच्या बहाण्याने एका प्राध्यापकासह अन्य दोघांना ७९.४६ कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पणजी पोलिसांनी करंझाळे येथील जेएसीआय ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेडच्या दोन संचालकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.


विमान इंधनवाहक टँकर उलटल्याने धावपळ

वास्को शहराबाहेर निघालेला विमान इंधनवाहक टँकर सेंट जासिंतो बेटापासून काही अंतरावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याकडेला उलटला. इंधनाने भरलेला टँकर उलटल्यावर इंधन गळती होऊ नये, यासाठी खबरदारी घेण्यात आली.

गुरुवार

वीज खात्याचे ६ अभियंते, ७ लाईन हेल्पर निलंबित

विजेचा शॉक लागून लाईनमनचा झालेला मृत्यू, तसेच अन्य अपघातांप्रकरणी वीज खात्यातील ६ अभियंते आणि ७ लाईन स्टाफच्या निलंबनाचे आदेश जारी करण्यात आले आहेत. निलंबित अभियंत्यांमध्ये ३ साहायक अभियंते आणि ३ कनिष्ठ अभियंत्यांचा समावेश आहे. कामात दुर्लक्ष आणि निष्काळजीपणाबद्दल ही कारवाई करण्यात आली आहे.

ड्रग्ज तस्कर कृष्णा बेळगावकरला हैदराबादमध्ये अटक

गोव्यात गांजा तस्करीचे जाळे चालवणारा तसेच मार्ना-पिळर्ण दरोड्यातील फरार आरोपी कृष्णा बेळगावकर याला तेलंगणा अमलीपदार्थविरोधी ब्युरोने हैदराबाद येथे अटक केली आहे. गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेने पुरविलेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.


उगवे येथे कार रस्ता दुभाजकावर आदळून तिघे जखमी

उगवे येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर झालेल्या भीषण अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली असून, तिघेजण जखमी झाले आहेत. चालकाला वाहन चालविताना डुलकी लागल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

शुक्रवार


डॉ. मेधा साळकर आरोग्य खात्याच्या नूतन संचालक

आरोग्य संचालनालयात मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. मेधा साळकर या आरोग्य खात्याच्या नव्या संचालक असतील. डॉ. रूपा नाईक निवृत्त झाल्याने आरोग्य खात्याच्या संचालकपदाचा ताबा डॉ. मेधा साळकर यांच्याकडे असेल. यासंदर्भातील आदेश सरकारने जारी केला आहे.

कोलवाळ तुरुंगाचे साहाय्यक जेलर डॉ. रामनाथ गावडे यांची आत्महत्या

साईनगर-उसगाव येथील डॉ. रामनाथ पंढरी गावडे (५४, मूळ मंगेशी) यांनी राहत्या घरात आत्महत्या केली. कोलवाळ तुरुंगात साहाय्यक जेलर म्हणून डॉ. रामनाथ गावडे नोकरी करत होते. लेखक, कवी म्हणून साहित्य क्षेत्रात ते प्रसिद्ध होते.

पतीच्या अपहरणप्रकरणी पत्नीला पोलीस कोठडी

मडगाव येथील संजील कुडचडकर यांच्या कथित अपहरण प्रकरणी त्यांच्या पत्नी मुख्य संशयित मारिया लुईझा फर्नांडिस कुडचडकर हिला अटक करण्यात आली होती. त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना इस्पितळात दाखल केले होते. शुक्रवारी इस्पितळातून डिस्चार्ज मिळाल्यावर न्यायालयात हजर केले असता त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

शनिवार

तोरसे उपसरपंचांचा राजीनामा

तोरसे पंचायतीचे उपसरपंच उत्तम वीर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. पंचायतीच्या सहा पंचांनी त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल केला होता.

मांद्रेत दोन अफगाणी नागरिकांना अटक

पेडणे तालुक्यातील मांद्रे परिसरात वैध व्हिसा व प्रवास कागदपत्रांशिवाय वास्तव्यास असलेल्या अफगाणिस्तानच्या दोन नागरिकांना मांद्रे पोलिसांनी अटक केली. अब्दुल फझील नुद्रत (२६) याला हरमल समुद्रकिनाऱ्याजवळ, तर मोहम्मद नसीर हमिदी (२९) याला मांद्रे येथील अॅक्वा बेला रिसॉर्ट परिसरातून ताब्यात घेण्यात आले.

बांबोळीत क्रॅश बॅरियरला धडकून कार भस्मसात

राष्ट्रीय महामार्ग-६६ वरील बांबोळी सैनिक आरामगृहाजवळ झालेल्या भीषण अपघातात कारला आग लागून १९ वर्षीय तरुणाचा होरपळून मृत्यू झाला. या दुर्घटनेत अन्य दोघे तरुण जखमी झाले.

लक्षवेधी

सीजेपी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये पोलीस मुख्यालयाबाहेर शनिवारी रात्री प्रचंड तणाव निर्माण झाला. या गोंधळादरम्यान एका महिला नगरसेविकेशी गैरवर्तन करून अश्लील शिवीगाळ व विनयभंग केल्याच्या आरोपावरून सुदीप दळवी यांच्याविरोधात पणजी पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मोपा विमानतळावर मित्राला पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे भासवून अज्ञात व्यक्तीने शिवोली येथील एका वयोवृद्ध महिलेला २ लाख रुपयांचा गंडा घातला. या प्रकरणी हणजूण पोलिसांनी सदर संशयिताविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

बोरी पुलासाठी भूसंपादन करण्यास गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने अंतर‌िम स्थगिती दिली असल्यामुळे सरकारसमोरची अडचण वाढली आहे. संपादित केलेल्या जमिनीवरील झाडे कापणे वा बांधकाम करण्यासाठी उच्च न्यायालयाची परवानगी घ्यावी लागेल, असेही उच्च न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.

गोव्यात प्रस्तावित वॉटर मेट्रो प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम अधिकृतपणे सुरू झाले आहे. पहिल्या टप्प्यात मांडवी आणि जुवारी नदी परिसरातील नऊ वॉटर मेट्रो मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. हा डीपीआर कोची मेट्रो रेल लिमिटेड (केएमआरएल) तयार करत असून, तो चार महिन्यांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे, अशी माहिती नदी परिवहनमंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिली. 

हेही वाचा
सर्व पहा