पणजी : गोव्यातील सत्ताधारी भाजप सरकारला सक्षम पर्याय देण्यासाठी मोठा विरोधी पक्ष असलेला काँग्रेस व गोवा फॉरवर्ड या पक्षांनी चर्चेला सुरुवात केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर व गोवा फॉरवर्ड अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी युतीसंदर्भात प्राथमिक चर्चा झाल्याचे समाजमाध्यमांवरुन स्पष्ट केले आहे.
राज्यातील भाजप सरकारला सत्तेबाहेर करायचे असल्यास विरोधकांच्या एकीची आवश्यकता आहे. त्या दृष्टीकोनातून गोवा फॉरवर्ड व काँग्रेस पक्षाने प्राथमिक चर्चेला सुरुवात केली आहे. गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गिरीश चोडणकर यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
सरदेसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, काणकोण येथील पक्षाच्या बैठकीत दिलेल्या आश्वासनानुसार भाजपविरोधी लोकांना हवा असलेला सक्षम पर्याय उभारण्याच्या दृष्टीने ही औपचारिक चर्चा सुरू केली आहे. विरोधकांच्या एकीकरणाच्या दिशेने हे पहिले पाऊल असल्याचे ते म्हणाले. काँग्रेस व गोवा फॉरवर्डच्या दोन्ही नेत्यांमधील ही बैठक राज्यातील भविष्यातील रणनीतीवर केंद्रीत होती. सध्याच्या भाजप सरकारच्या कार्यकाळात राज्यासमोर अनेक गंभीर प्रश्न उभे आहेत. पर्यावरणासह जल, जंगल व वनांच्या संवर्धनाचा प्रश्न, भ्रष्टाचार आणि विविध घोटाळ्यांवर जनमानसात जागृती करण्याबाबत चर्चा झाली.
बैठकीनंतर गिरीश चोडणकर यांनी समाजमाध्यमांवर प्रतिक्रिया दिली असून; गोव्याच्या व्यापक हितासाठी ही युती अधिक मजबूत करणे गरजेचे आहे. कोणतीही युती तेव्हाच यशस्वी होते, जेव्हा ती शिस्त, परस्परांबद्दलचा आदर, युती धर्म आणि सामायिक ध्येयासाठी त्याग करण्याच्या तयारीवर आधारित असते, असे चोडणकर म्हणाले. भाजपच्या कथित भ्रष्ट कारभाराला शह देऊन राज्यातील जनतेला उत्तरदायी आणि लोककेंद्रित पर्याय देणे हेच उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी गोवा फर्स्ट या संकल्पनेचा पुनरुच्चार करत विरोधी ऐक्यासाठी पुढाकार घेतल्याचे सांगितले. गोव्याचे हित हेच आमच्यासाठी सर्वतोपरी आहे. या आघाडीचा जो काही राजकीय रोडमॅप तयार होईल, तो गोमंतकीय जनतेसमोर मांडण्यात येईल.
प्रत्येक निर्णयाच्या केंद्रस्थानी गोव्याची जनता हाच मुद्दा असेल, असे ते म्हणाले. एकत्र या आणि जिंका हा नारा देत त्यांनी विरोधकांच्या या नव्या आघाडीबद्दल विश्वास व्यक्त केला. लवकरच या युतीच्या पुढील वाटचालीसह आगामी रणनीतीवर आणखी विस्तृत चर्चा आणि समन्वय बैठक होणार असल्याचे समजते.


