पणजी : पेडणे तालुक्यातील मांद्रे परिसरात बेकायदेशीररीत्या वास्तव्यास असलेल्या दोन अफगाण नागरिकांविरुद्ध मांद्रे पोलिसांनी स्वतंत्र कारवाई करत त्यांना अटक केली आहे. (Two Afghani citizens arrested in Goa, India) दोघेही वैध व्हिसा व प्रवास कागदपत्रांशिवाय गोव्यात राहत असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. त्यानंतर त्यांच्याविरुद्ध इमिग्रेशन अँड फॉरेनर्स ॲक्ट, २०२५ च्या कलम २३(अ) अंतर्गत गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.
पहिल्या प्रकरणात अब्दुल फझील नुद्रत (वय २६), हा अफगाणिस्तानचा नागरिक ३० जुलै रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजता हरमल समुद्र किनाऱ्यावर पार्किंग परिसरात गस्तीदरम्यान पोलिसांच्या हाती लागला. चौकशीदरम्यान तो वैध व्हिसाशिवाय भारतात व गोव्यात वास्तव्यास असल्याचे उघड झाले. त्याला रात्री ११.१५ वाजता मांद्रे पोलीस ठाण्यात अटक करण्यात आली.
दुसऱ्या प्रकरणात मोहम्मद नसीर हमिदी (वय २९) हा अफगाणिस्तानचा नागरिक ३० जुलै रोजी सायंकाळी सुमारे ६.१५ वाजता मांद्रे येथील ॲक्वा बेला रिसॉर्ट परिसरात आढळून आला. त्याच्याकडेही वैध व्हिसा अथवा आवश्यक प्रवास कागदपत्रे नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्याला रात्री ११.१९ वाजता अटक करण्यात आली.
दोन्ही आरोपींना अटक करताना सर्वोच्च न्यायालयाने निर्धारित केलेल्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यात आले. तसेच, संबंधित आरोपींच्या अटकेची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना देण्यासाठी एफआरआरओ (Foreigners Regional Registration Office) मार्फत अफगाणिस्तानच्या दूतावासाशी संपर्क साधण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
मांद्रे पोलिसांकडून तपास सुरू
या दोन्ही प्रकरणांचा पुढील तपास मांद्रे पोलिसांकडून (Mandrem Police) सुरू आहे. आरोपींच्या व्हिसा कालावधी संपल्यानंतरच्या हालचाली, वास्तव्यासंदर्भातील माहिती तसेच भारतात बेकायदेशीर वास्तव्यास राहण्यामागील उद्देश याचा तपास केला जात आहे.


