साळावली पाठोपाठ गवाणे धरण देखील ‘ओव्हरफ्लो’

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
5 mins ago
साळावली पाठोपाठ गवाणे धरण देखील ‘ओव्हरफ्लो’

पणजी : धरण क्षेत्रात होत असलेल्या समाधानकारक पावसामुळे धरणाच्या पाणी साठ्यात वाढ होत आहे. गुरुवारी साळावली धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. शुक्रवारी सकाळी ७ वाजता गवाणे धरण (Gavane Dam overflow) देखील ‘ओव्हरफ्लो’ झाले.

मागील वर्षी गवाणे धरण २० जून रोजी भरले होते. तर २०२४ मध्ये ही दोन्ही धरणे ७ जुलै रोजी भरली होती. १ ऑगस्ट रोजी पंचवाडी धरण ९१ टक्के, आमठाणे धरण ८२ टक्के, तिळारी धरण ८३ टक्के, चापोली धरण ६४ टक्के, तर अंजुणे धरण ५८ टक्के भरले होते. 

सध्या तिळारी धरणातून प्रति सेकंद २१५.१४ घनमीटर (क्युमेकस) पाण्याचा विसर्ग होत आहे. पावसाचा जोर कायम असल्यास पुढील काही दिवसातच पंचवाडी धरण १०० टक्के भरण्याची शक्यता आहे. यंदा राज्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने धरणे भरण्यास उशीर होत आहे.

हवामान खात्याने राज्यात १ आणि २ ऑगस्ट दरम्यान मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. राज्यात १ जून ते ३१ जुलै दरम्यान ५०.९४ इंच पावसाची नोंद झाली आहे. यंदा पावसाचे प्रमाण ३४ टक्क्यांनी कमी आहे.  वरील कालावधीत सांगेमध्ये ६७.५४ इंच, धारबांदोडामध्ये ६५.७० इंच, केपेमध्ये ६३.८३ इंच, काणकोणमध्ये ६२.९७, वाळपईमध्ये ६२.८७ इंच तर फोंडा मध्ये ५५.६७ इंच पावसाची नोंद झाली आहे.

शुक्रवारी पणजीत कमाल ३०.९ अंश व किमान २६.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मुरगाव  मधील कमाल तापमान ३०.६ अंश व किमान तापमान २६ अंश सेल्सिअस राहिले. पुढील सहा दिवस राज्यातील कमाल तापमान ३० ते ३२ अंश व किमान तापमान २६ ते २७ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे.

हेही वाचा
सर्व पहा