पणजी: केंद्र सरकारने इथेनॉल मिश्रित इ २० पेट्रोलची विक्री करणे सक्तीचे केले आहे. मात्र याबाबत जनतेला कोणतीही माहिती देण्यात आली नाही. गोव्यात मागील सहा महिन्यांपासून इ २० पेट्रोलची विक्री सुरू झाली आहे. या पेट्रोलमुळे वाहने खराब झाल्याचे देशभरात उदाहरणे पुढे आली आहेत. अशीच परिस्थिती येत्या काही काळात गोव्यात पाहायला मिळेल. यामुळे इथेनॉल मिश्रित पेट्रोलची सक्ती करू नये अशी मागणी आम आदमी पक्षाने केली. याबाबत पक्षाने येथील पेट्रोल पंपावर जागृतीही केली.
प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक यांनी सांगितले की, भाजप सरकारने कोणतेही नियोजन न करता इ २० पेट्रोल विक्री सुरू केली आहे. याबाबत नागरिकांना विश्वासात घेण्यात आले नाही नाही. या पेट्रोलमुळे अनेक वाहनांचे मायलेज कमी झाले आहे. तसेच दुरुस्ती खर्च वाढला आहे. वाहन सुरू न होणे, अचानक बंद पडणे अशा समस्या निर्माण झाल्या आहेत. याबाबत आम्ही राज्यभरातील विविध पेट्रोल पंपांवर जाऊन तेथील ग्राहक तसेच वाहन मॅकेनिकांसोबत चर्चा केली. यातील अनेकांनी वाहनांच्या समस्या निर्माण झाल्याचे सांगितले.
ते म्हणाले, पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी या पेट्रोलच्या विरोधात देशव्यापी मोहीम सुरू केली आहे. केजरीवाल यांनी वाहन उत्पादक कंपन्यांना इ २० पेट्रोलमुळे वाहने खराब होतात का अशी विचारणा केली होती. काही उद्योजकांनी त्यांना या पेट्रोलमुळे वाहन खराब होण्याची शक्यता असल्याचे सांगितले. याबाबत उद्या दिल्ली येथे राष्ट्रीय टाउन हॉल परिषदेचे आयोजन केले आहे. परिषद होऊ नये म्हणून दिल्ली पोलीस आमच्यावर दबाव आणत आहेत. मात्र आम्ही ती यशस्वी करणार आहोत. गोव्यातील जनतेने या परिषदेला ऑनलाईन पद्धतीने सहभागी व्हावे.


