मडगाव : मडगावातील संजील कुडचडकर यांच्या कथित अपहरण प्रकरणी मुख्य संशयित मारिया लुईझा फर्नांडिस कुडचडकर हिला अटक केली होती. तिची तब्येत बिघडल्याने तिला इस्पितळात दाखल केले होते. शुक्रवारी इस्पितळातून डिस्चार्ज मिळाल्यावर तिला न्यायालयात हजर केले असता, सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
डॉ. सतीश कुडचडकर यांचा मुलगा संजील कुडचडकर यांचे २४ जुलै रोजी अपहरण झाल्याची सीसीटीव्ही फुटेज समाज माध्यमांवर व्हायरल झाली. यानंतर मडगाव पोलिसांनी कर्नाटकातील कारवार येथून कारसह संशयिताचा शोध घेतला. कथित अपहरणाचा हा प्रकार कोंब मडगाव येथील संजील यांच्या घराबाहेर घडला.
संजील यांच्या मुलीच्या तक्रारीनंतर मडगाव पोलिसांनी (Margao Police) या प्रकरणात अपहरणाचा गुन्हा नोंद करत संशयित नासीर बिन अहमद मसूद (रा. मायणा कुडतरी, मूळ हैदराबाद ) व शाह अली सौदागर (रा. दवर्ली, मूळ सोलापूर) यांना अटक केली होती. न्यायालयाने प्रथम दोन दिवस व त्यानंतर पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. तसेच दोन्ही संशयितांचा जामीन अर्जही न्यायालयाने फेटाळून लावला आहे.
याप्रकरणात संजील कुडचडकर यांची पत्नी मारिया लुईझा फर्नांडिस कुडचडकर ही मुख्य संशयित असून मालमत्तेच्या वादातून हा प्रकार घडला आहे. संजील यांचे अपहरण करून कारवार येथे नेत मालमत्तेच्या कागदपत्रांवर सह्या करण्यासाठी जबरदस्ती करण्यात आल्याची शक्यता असून पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.
संशयित मारिया हिला कारवार येथून अटक करण्यात आली होती. मडगाव येथे आणण्यात आली असता, तिची तब्येत बिघडल्याने तिला इस्पितळात दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी मारिया हिला डिस्चार्ज मिळाल्यानंतर तिला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.


