भिवंडी: ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरातील बाळूजी नगर, गंगाराम वाडी परिसरात गुरुवारी मध्यरात्री एका भीषण दुर्घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला. येथील 'कोहिनूर अपार्टमेंट' या चार मजली इमारतीचा 'बी' विंग अचानक पत्त्यांच्या बंगल्यासारखा कोसळला. या दुर्दैवी दुर्घटनेत आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला असून अनेक नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), ठाणे आपत्ती प्रतिसाद दल (TDRF) आणि भिवंडी अग्निशामक दलाच्या तुकड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
स्थानिकांची सतर्कता अन् मोठा अनर्थ टळला
मिळालेल्या माहितीनुसार, दुर्घटनाग्रस्त कोहिनूर अपार्टमेंटमध्ये एकूण ४८ फ्लॅट्स होते. गुरुवारी रात्री सुमारे ११ ते ११:३० वाजेच्या सुमारास इमारतीच्या एका बाजूने तडे गेल्याचा मोठा आवाज आला. इमारतीचा मुख्य पिलर अत्यंत धोकादायक झाल्यामुळे रात्रीच्या वेळीही तेथे दुरुस्तीचे काम सुरू होते. इमारत एका बाजूने झुकत असल्याचे लक्षात येताच स्थानिक रहिवाशांनी दाखवलेल्या समयसूचकतेमुळे मोठा अनर्थ टळला. त्यांनी तत्परता दाखवत अनेक कुटुंबांना वेळेत सुरक्षित बाहेर काढले. मात्र, दुरुस्तीचे काम करणारे मजूर आणि तळमजल्यावर राहणारे नागरिक आतच अडकून पडले आणि काही क्षणांतच इमारतीचा मोठा भाग जमिनदोस्त झाला.
महाराष्ट्र के भिवंडी में शुक्रवार को एक चार मंजिला इमारत का बड़ा हिस्सा ढह गया। प्रारंभिक जानकारी के अनुसार इमारत जर्जर हो चुकी थी और उस पर मरम्मत का काम चल रहा था, तभी अचानक उसका एक हिस्सा भरभराकर गिर गया।#Bhiwandi pic.twitter.com/iF8OEZ1KYb
— 𝕍𝕚𝕛𝕒𝕪 𝕊𝕒𝕟𝕘𝕙𝕒𝕣𝕤𝕙𝕒 (@vijaysangharsha) July 31, 2026
अजूनही ढिगाऱ्याखाली नागरिक अडकल्याची भीती
या भीषण दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला आहे, तर तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ढिगाऱ्याखाली अजूनही ५ ते ६ मजूर व नागरिक अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे हेवी मशिनरी आणि क्रेनच्या साहाय्याने ढिगारा उपसण्याचे काम रात्रंदिवस सुरू आहे.
महापालिकेची नोटीस अन् रहिवाशांचा हट्ट
भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही इमारत महापालिकेकडून आधीच 'धोकादायक' म्हणून घोषित करण्यात आली होती. प्रभाग अधिकाऱ्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून सुमारे २५ कुटुंबे आधीच सुरक्षित ठिकाणी हलवली होती. मात्र, तळमजल्यावरील एका कुटुंबाने जागा सोडण्यास नकार दिला होता आणि ते तेथे स्वतःहून दुरुस्तीचे काम करून घेत होते. या निष्काळजीपणामुळेच ही मोठी दुर्घटना घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.


