झारखंडच्या धनबादमध्ये २५ ठिकाणी ईडीची छापेमारी; ६०० कोटींची बेनामी संपत्ती जप्त

ऑपरेशन ब्लॅक डायमंड अंतर्गत कोळसा माफियांविरुद्ध छेडलेल्या मोहिमेत ईडीला मोठे यश.

Story: वेब डेस्क | गोवन वार्ता |
1 hours ago
झारखंडच्या धनबादमध्ये २५ ठिकाणी ईडीची छापेमारी; ६०० कोटींची बेनामी संपत्ती जप्त

धनबाद : देशाची 'कोळसा राजधानी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धनबादमध्ये 'ऑपरेशन ब्लॅक डायमंड' अंतर्गत २५ हून अधिक ठिकाणी एकाच वेळी छापेमारी करण्यात आली. केंद्र सरकारच्या आर्थिक गुन्हेगारीविरोधातील 'झिरो टॉलरन्स' धोरणाचा भाग म्हणून ही धडक कारवाई राबवण्यात आली असून, यामुळे काळ्या बाजारातील बड्या सिंडिकेटचे धाबे दणाणले आहेत.

या व्यापक तपासादरम्यान सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) हाती सुमारे ६०० कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या बेनामी मालमत्तांची कागदपत्रे लागली आहेत. याशिवाय, १६० कोटी रुपयांचे म्युच्युअल फंड गोठवण्यात आले असून २०० हून अधिक स्थावर मालमत्ता, व्यावसायिक संकुले आणि बँक खात्यांचे तपशील जप्त करण्यात आले आहेत. भारत कोकिंग कोल लिमिटेडचे (बीसीसीएल) प्रमुख आउटसोर्सिंग कंत्राटदार लाल बाबू सिंग आणि कोळसा व्यापारी अनिल गोयल यांच्याशी संबंधित ठिकाणांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले होते. मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यानुसार (पीएमएलए) झालेल्या या कारवाईत १.०२ कोटी रुपयांची रोकड आणि डिजिटल पुरावेही ताब्यात घेण्यात आले आहेत.

कारवाईदरम्यान झरियातील शिमला बहाल भागात एका व्यापाऱ्याने घराचा दरवाजा आतून बंद करून तपासात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, अधिकाऱ्यांनी अत्यंत धैर्याने शिडीच्या साहाय्याने घरात प्रवेश करून झडतीची प्रक्रिया पूर्ण केली. लोयाबाद परिसरातही स्थानिक स्तरावर विरोध दर्शवण्याचा प्रयत्न झाला, परंतु यंत्रणेच्या खंबीर भूमिकेमुळे ही कारवाई यशस्वीरीत्या पार पडली.

गेल्या अनेक दशकांपासून धनबादमध्ये बेकायदेशीर उत्खनन, खंडणी आणि अनधिकृत वसुलीचे जाळे सक्रिय असल्याचा आरोप होत होता. या पार्श्वभूमीवर ईडीने अत्यंत गुप्तपणे रचलेला हा सापळा कोळसा माफियांचा आर्थिक कणा मोडणारा ठरला आहे. ही केवळ एका धाडीपुरती मर्यादित कारवाई नसून, संघटित आर्थिक गुन्हेगारीवर घालण्यात आलेला एक मोठा घाव आहे. सध्या या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, आगामी काळात यात आणखी काही बड्या व्यक्तींची नावे समोर येण्याची शक्यता तपास यंत्रणांकडून वर्तवण्यात येत आहे.

हेही वाचा
सर्व पहा