डिचोलीच्या सामाजिक आरोग्य केंद्रात गोव्यातील पहिली 'लेजर व्हेरिकोज वेन्स' उपचार सुविधा सुरू

मुख्यमंत्री म्हणाले-नागरिकांनी केवळ उपचारांवर अवलंबून न राहता नियमित योगासने आणि व्यायामाद्वारे स्वतःच्या प्रकृतीची उत्तम काळजी घेणे अत्यंत गरजेचे

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
35 mins ago
डिचोलीच्या सामाजिक आरोग्य केंद्रात गोव्यातील पहिली 'लेजर व्हेरिकोज वेन्स' उपचार सुविधा सुरू

पणजी : गोव्याच्या आरोग्य क्षेत्रात आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा पार पडला असून, डिचोली येथील कम्युनिटी हेल्थ सेंटरमध्ये (CHC) अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर कॉम्प्लेक्स आणि गोव्यात प्रथमच 'इंटरव्हेंशनल लेजर व्हेरिकोज वेन ट्रीटमेंट' (Interventional Laser Vein Treatment) या विशेष सेवांचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत या नवीन आरोग्य सुविधांचा लोकार्पण सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, प्रेमेंद्र शेठ, डॉक्टर राजाराम म्हांबरे, आरोग्य खात्याचे सहसचिव प्रणव भट यांसह इतर मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



खाजगी उपचारांच्या खर्चाचा बोजा टळणार; संपूर्ण उपचार मोफत

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले की, गोव्याच्या इतिहासात पहिल्यांदाच सरकारी रुग्णालयात 'व्हेरिकोज वेन्स' (Varicose Veins) वरील लेजर ट्रीटमेंट पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहे. खाजगी रुग्णालयांमध्ये या एकाच उपचारासाठी हजारो ते लाखो रुपये खर्च करावा लागतो, जो सर्वसामान्य नागरिकांना परवडणारा नसतो. मात्र, आता पेडणेपासून ते काणकोणपर्यंतच्या ज्या नागरिकांना खाजगी उपचार घेणे शक्य नाही, ते सर्वसामान्य नागरिक बिचोलीच्या कम्युनिटी हेल्थ सेंटरमध्ये या सुविधेचा पूर्णपणे मोफत लाभ घेऊ शकतात. उशिरा उपचार न मिळाल्यास पायांच्या शिरा सुजून मोठे होणे, चालताना तीव्र त्रास होणे यांसारखे गंभीर आजार बळावू शकतात, त्यामुळे या सुविधेमुळे सर्वसामान्य रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.

ओपीडी आणि शस्त्रक्रियेचे सुटसुटीत वेळापत्रक

बिचोली कम्युनिटी हेल्थ सेंटरमध्ये या उपचारांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. दर गुरुवारी सकाळी ते दुपारी डॉ. राजाराम मामरे यांची ओपीडी (OPD) असेल. शुक्रवार आणि शनिवार या दिवशी रुग्णांचे फॉलो-अप तपासले जातील, तर दर मंगळवारी ऑपरेशन थिएटरमध्ये (OT) इंटरव्हेंशनल लेजर प्रक्रिया पार पाडली जाईल. ही लेजर ट्रीटमेंट अतिशय साधी असून, यामध्ये कोणतीही मोठी ओपन सर्जरी करण्याची गरज भासत नाही. उपचारानंतर रुग्ण अवघ्या काही तासांत घरी जाऊ शकतो.

साखळीतील 'कॅटॅरेक्ट' ओटीच्या यशानंतर डिचोलीत नवे पाऊल

या प्रसंगी बोलताना मुख्यमंत्र्यांनी गेल्या वर्षभरात राबवलेल्या इतर आरोग्य प्रकल्पांची माहिती दिली. साखळी कम्युनिटी हेल्थ सेंटरमध्ये दोन कोटी रुपये खर्च करून डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी (कॅटॅरेक्ट ओटी) विशेष केंद्र सुरू करण्यात आले होते, जिथे आतापर्यंत एक हजारहून अधिक जणांची यशस्वी शस्त्रक्रिया पूर्ण झाली आहे. राज्य सरकार प्रत्येक तालुक्यात आणि कम्युनिटी हेल्थ सेंटरमध्ये विशिष्ट आजारांसाठी स्वतंत्र व विशेष सुविधा निर्माण करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दीनदयाळ स्वास्थ्य सेवा योजना आणि आरोग्य विमा संरक्षण

गोव्यात 'दीनदयाळ स्वास्थ्य सेवा योजना' (DDSSY) कार्डाच्या माध्यमातून नागरिकांना मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय लाभ मिळत आहेत. कुटुंबातील सदस्यांच्या संख्येनुसार चार लाखांपासून ते सहा लाखांपर्यंतचे आरोग्य संरक्षण या कार्डाद्वारे दिले जात असून, यासाठी सरकार खाजगी रुग्णालयांच्या माध्यमातून दरवर्षी ७० कोटींहून अधिक रुपये खर्च करत आहे. तसेच, आगामी काळात पीएम रिलीफ फंदांतर्गत काही रुग्णालयांची नोंदणी करून किडनी आणि लिव्हर ट्रान्सप्लांटसारख्या मोठ्या उपचारांसाठी तीन लाखांपर्यंतचा लाभ मिळवून देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

नियमित योग आणि फिटनेसवर भर

केवळ रुग्णालये आणि पायाभूत सुविधा उभारून चालणार नाही, तर नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी स्वतः घेणे गरजेचे आहे, असे आवाहन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले. मधुमेह, उच्च रक्तदाब यांसारख्या जीवनशैलीशी संबंधित आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी नियमित व्यायाम, योगासने आणि आयुष डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप (Preventive Health Checkup) करून घेण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.

हेही वाचा
सर्व पहा