E20 पेट्रोलने मायलेज कमी होतेय? केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी संसदेत केले मान्य!

E20 पेट्रोलच्या वापरामुळे वाहनांचे मायलेज २ ते ६ टक्क्यांनी कमी होऊ शकते, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत दिली. मात्र, यामुळे कार्बन उत्सर्जन ३० टक्क्यांनी घटणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
just now
E20 पेट्रोलने मायलेज कमी होतेय? केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी संसदेत केले मान्य!

नवी दिल्ली : E20 पेट्रोलच्या (२० टक्के इथेनॉल मिश्रित इंधन) वापरामुळे वाहनांचे मायलेज कमी होत असल्याच्या तक्रारींवर अखेर केंद्र सरकारने अधिकृत मोहर उमटवली आहे. E20 पेट्रोलमुळे गाड्यांच्या इंधन कार्यक्षमतेवर काही प्रमाणात परिणाम होतो आणि मायलेज घटते, ही वस्तुस्थिती आता स्पष्ट झाली आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली. गडकरी यांनी स्पष्ट केले की, E20 पेट्रोलच्या वापरामुळे वाहनांच्या प्रकारानुसार आणि वयानुसार मायलेज २ ते ६ टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकते. गाडी किती जुनी आहे आणि कोणत्या श्रेणीतील आहे, यावर हा परिणाम अवलंबून असतो. मात्र, ऑन-रोड वाहन चाचण्यांमध्ये E20 मुळे इंजिन फेल्युअर किंवा इंजिन बंद पडल्याचे कोणतेही संकेत मिळालेले नाहीत, असा दिलासाही त्यांनी दिला.

तांत्रिक दृष्टिकोनातून पाहता, या संदर्भात ऑटोमोबाईल रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (ARAI), सोसायटी ऑफ ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (SIAM) आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) यांनी संयुक्त अभ्यास केला आहे. या अभ्यासात BS-III, BS-IV आणि BS-VI मानकांच्या वाहनांवर E20 इंधनाचा कसा प्रभाव पडतो, याचे सखोल मूल्यमापन करण्यात आले.

तांत्रिक चाचण्यांनुसार, E20 इंधनामुळे मायलेजमध्ये काहीशी घट होत असली तरी, वाहनांचे प्रवेग (Acceleration) आणि ड्राईव्हिंगचा अनुभव (Ride Quality) अधिक उत्तम होतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, पूर्वीच्या E10 इंधनाच्या तुलनेत E20 मुळे कार्बन उत्सर्जन सुमारे ३० टक्क्यांपर्यंत कमी होते. तथापि, जुन्या BS-III गाड्यांमधील काही रबर पार्टस् आणि गॅस्केट्स E20 इंधनामुळे खराब होण्याची शक्यता असल्याने ते बदलावे लागू शकतात, असेही सरकारने नमूद केले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर तरुण वाहनचालक E20 पेट्रोलच्या परिणामांवरून सातत्याने प्रश्न उपस्थित करत आहेत. विशेषतः जुन्या वाहनांच्या मायलेजवर होणारा परिणाम आणि इंजिनच्या आयुष्याबद्दल वाहनधारकांमध्ये चिंता होती. यावर स्पष्टीकरण देताना सरकारने म्हटले आहे की, हे इंधन टप्प्याटप्प्याने आणि संपूर्ण तांत्रिक चाचण्यांनंतरच बाजारात आणले गेले आहे.

प्रमुख वाहन उत्पादक कंपन्यांनी E20 इंधनाच्या वापरावरही गाड्यांची वॉरंटी कायम राहील, असे स्पष्ट केले आहे. मात्र, ज्या वाहनांची वॉरंटी संपली आहे आणि जी जुनी वाहने मूळतः E20 साठी डिझाइन केलेली नव्हती, त्यांच्या बाबतीत वाहनचालकांमध्ये अजूनही शंका कायम आहे. तरीही, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि हरित ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

हेही वाचा
सर्व पहा