पणजी : 'आमचे गोवा (Amche Goa)' या फेसबुक पेजवर श्री स्वामी समर्थ यांच्याबाबत कथित आक्षेपार्ह व अपमानास्पद टिपण्या असलेला पोस्ट प्रसिद्ध करून भाविकांच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी हणजूण (Anjuna) पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित फेसबुक पोस्टमध्ये श्री स्वामी समर्थ यांच्याबाबत आक्षेपार्ह स्वरूपाच्या टिपणी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पोस्टमुळे भाविकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याची तक्रार शिवोली येथील श्री स्वामी समर्थ मठ परिवार व इतर चार हिंदू संघटनांनी पोलिसांकडे दाखल केली होती. शिवोली येथे उभारलेल्या श्री स्वामी समर्थांच्या मूर्तीबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह टिप्पणी करण्यात आली होती.
तक्रारीची दखल घेत हणजूण पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील (BNS) संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. संबंधित पोस्ट कोणी तयार केली, ती कोणी प्रसारित केली आणि त्यामागील उद्देश काय होता, याचा शोध पोलीस घेत आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास हणजूण पोलीस करत आहेत.


