पणजी : गोव्यात २६ ठिकाणी बसवलेल्या एआय कॅमेऱ्यांवरून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना १ ऑगस्टपासून तालांव (चलन) देणे सुरू होणार आहे. कार्यवाहिविषयी आज शुक्रवारी संध्याकाळी बैठक होणार; अशी माहिती वाहतूक खात्याचे संचालक अरविंद खुटकर यांनी दिली.
एआय कॅमेरे बसवले तेव्हा दर दिवशी ४० ते ५० हजार वाहन चालकांकडून नियमांचे उल्लंघन होत होते. आता नियम उल्लंघनाची संख्या उतरून दर दिवशी १ हजारावर पोचली आहे. तसेच वाहनांचे इन्शुरन्स, प्रदूषण प्रमाणपत्र घेण्याचे प्रमाण वाढले आहे. एआय कॅमेरे आणि वाहतूक नियमांचे पालन करण्याविषयी चांगली जागृती झाली आहे. आता १ ऑगस्टपासून एआय कॅमेऱ्यांवरून तालांव देणे सुरू होणार आहे. आज संध्याकाळी उच्च पातळीवर बैठक होणार. या बैठकीत इतर संबंधीत निर्णय होणार, अशी माहिती वाहतूक संचालक अरविंद खुटकर यांनी दिली.
सर्वोच्च न्यायालयाच्या समितीने केलेल्या शिफारशीनुसार वाहतुकीवर देखरेख ठेवण्यासाठी एआय कॅमेरे बसवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तालांव देणे हा एआय कॅमेरे बसवण्याचा हेतू नाही. वाहतूक नियम पाळावेत म्हणून जागृती करणे हा हेतू आहे. सध्या तरी जागृतीवर भर आहे, असे वाहतूकमंत्री मॉविन गुदिन्हो यांनी स्पष्ट केले. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांना १५ जुलै पासून तालांव देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. मात्र, शेवटच्या क्षणी तो पुढे ढकळला. नियम मोडणाऱ्या हजारो वाहन चालकांची नोंद कॅमेऱ्यात होते.
गोव्यात अपघातांचे प्रमाण वाढत आहे. अपघातांसहीत मृत्यू पावणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. हेल्मेट घालण्यासहीत वाहतूक नियमांचे पालन केले जावे म्हणून सरकारचा प्रयत्न सुरू आहे. सर्वत्र वाहतूक व्यवस्थापनासाठी वाहतूक पोलीस ठेवणे शक्य नसल्याने एआय कॅमेरे बसवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. प्रथम पातळीवर ९२ ठिकाणी एआय कॅमेरे बसवण्याचा निर्णय झाला आहे.
सध्या २६ ठिकारी एआय कॅमेरे बसवले आहेत. हेल्मेट न घातल्यास, सीटबेल्ट न लावल्यास, वाहन चालवताना मोबाईलवर बोलल्यास त्याची नोंद एआय कॅमेऱ्यांवर होत आहे. पूर्वी नियम मोडणाऱ्या वाहनचालकांचे प्रमाण जास्त होते. आता ते बरेच खाली आले आहे. ही स्थिती समाधानकारक आहे, असे वाहतूक संचालकांनी सांगितले.


