श्रीनगर: जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा अत्यंत भ्याड आणि क्रूर कृत्य केले आहे. २०२५ मध्ये पहलगाम येथे झालेल्या रक्तांजीत हल्ल्याच्या धर्तीवर कुलगाममध्येही परप्रांतीय मजुरांना त्यांची ओळख विचारून निशाणा बनवण्यात आले. मजुरांना नाव विचारल्यानंतर त्यांना वेगळे करून अत्यंत जवळून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या घटनेत छत्तीसगड येथील एका मजुराचा जागीच मृत्यू झाला असून, दुसरा मजूर गंभीर जखमी झाला आहे.
आधी नाव विचारले आणि नंतर झाडल्या गोळ्या
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कुलगाम येथे कार्यरत असलेल्या परप्रांतीय मजुरांच्या गटाजवळ दहशतवादी पोहोचले. त्यांनी मजुरांची नावे विचारून त्यांची धार्मिक ओळख पटवली. त्यानंतर दोन मजुरांना बाजूला करून अत्यंत जवळून (पॉइंट-ब्लँक रेंज) त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. या ठिकाणी अनेक परप्रांतीय मजूर उपस्थित होते, मात्र ठराविक मजुरांनाच बाजूला काढून लक्ष्य करण्यात आल्यामुळे हे कृत्य धार्मिक आधारावर घडवून आणलेली टार्गेट किलिंग असल्याचे स्पष्ट होत आहे.
लश्कर आणि TRF च्या दहशतवाद्यांवर संशय
या हल्ल्यामागे एक स्थानिक आणि एक परदेशी दहशतवादी सहभागी असल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. गेल्या वर्षी 'लश्कर-ए-तय्यबा' व 'द रेजिस्टन्स फ्रंट' (TRF) मध्ये सामील झालेल्या मोहम्मद लतीफ या दहशतवाद्याचा या कटात मुख्य हात असावा, या दृष्टीने तपास यंत्रणा कसून चौकशी करत आहेत.
सुरक्षा दलाकडून सर्च ऑपरेशन, राजकीय स्तरातून तीव्र निषेध
हल्ल्याची माहिती मिळताच जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी पोलीस महासंचालक (DGP) नलिन प्रभात यांच्यासह वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला. दहशतवाद्यांच्या शोधासाठी संपूर्ण परिसराला घेराबंदी करण्यात आली असून कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे.
दरम्यान, या दहशतवादी हल्ल्याचा राजकीय स्तरातून तीव्र निषेध करण्यात येत आहे. जम्मू-काश्मीर प्रदेश काँग्रेस कमिटीने (JKPCC) या हल्ल्याची कठोर शब्दांत निंदा केली असून, दहशतवाद्यांचे हे नापाक उद्देश हाणून पाडण्यासाठी सुरक्षा दलांनी तातडीने निर्णायक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.


