पणजी : काही दिवसांपूर्वी गोव्यात विद्यार्थ्यांची निदर्शने झाली. यावेळी परराज्यातील काही लोक गोव्यात आले होते. त्यांनी स्थानिक मुलांना, पालकांना आंदोलनात सहभागी करून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र गोव्यातील लोक सुशिक्षित असल्याने, ते याला बळी पडले नाहीत. यापुढेही गोमंतकीयांनी अशा विचित्र लोकांच्या मानसिकतेला, त्यांच्या आंदोलनाला बळी पडू नये. आपल्या अधिकारांसाठी जरूर लढावे; मात्र आपण सुसंस्कृत आहोत हे लक्षात ठेवावे असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
मुख्यमंत्र्यांनी आपल्या व्हिडिओ संदेशातून जनतेशी संवाद साधला. ते म्हणाले, नुकत्याच देशभर नीट परीक्षेबाबत झालेल्या आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत अपमानास्पद, अभद्र आणि अश्लील भाषेचा वापर करण्यात आला. त्यांच्या दिवंगत आईबाबाना देखील चुकीचे शब्द वापरण्यात आले. देशाला, पोलिसांना शिवीगाळ करणे चुकीचे होते.
असे असूनही, मोदी यांनी रागाऐवजी करुणेचा मार्ग निवडला. तरुणांकडून अशा चुका होतात असे सांगत त्यांनी मोठ्या मनाने सर्वांना माफ केले. त्यांनी काल रात्री एका व्हिडिओ काढून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
हा व्हिडिओ आंदोलन करणाऱ्या तरुणांसह संपूर्ण जनरेशन झी साठी आहे. मोदी यांनी आपल्या व्हिडिओतून अशा प्रकारात सहभागी असलेल्या तरुणांची दिशाभूल झाली असावी, अशी भावना व्यक्त केली. त्यांनी या तरुणांबद्दल चिंता दर्शवली. तसेच, द्वेषाऐवजी संयम, सहानुभूती आणि समंजसपणाने त्यांना योग्य दिशा दाखवण्याचे आवाहन देशवासियांना केले. पालक आणि शिक्षकांनी समजावून सांगण्याचे, त्यांच्यावर चांगले संस्कार करण्याचे आवाहन त्यांनी केले. पंतप्रधान मोदी यांची ही प्रतिक्रिया पुन्हा एकदा खऱ्या नेतृत्वाची ओळख करून देते.
गोव्यातील तरुणांना आवाहन
मी गोव्यातील तरुणांना आवाहन करतो की, त्यांनी अपमानास्पद भाषा, चुकीची माहिती आणि नकारात्मकता यांच्यापासून दूर राहावे. आपण सर्वजण आदरपूर्ण संवाद, जबाबदार नागरिकत्व आणि लोकशाहीतील विधायक सहभाग या मूल्यांची जोपासना करूया. समाजात फूट पाडणाऱ्या विचारांमुळे भरकटण्याऐवजी, आपण आपली ऊर्जा नवनिर्मिती, राष्ट्रनिर्मिती आणि विकसित गोवा व विकसित भारत या सामायिक ध्येयाच्या दिशेने लक्ष केंद्रित करूया


