पत्रकार परिषदेत माहिती देताना उद्योजक सदगुरु धुमे. सोबत कार्यकर्ते.
गोवन वार्ता प्रतिनिधी
डिचोली : युवा उद्योजक तथा समाजसेवक सदगुरु धुमे यांनी आगामी विधानसभा निवडणूक मये मतदारसंघातून लढविणार असल्याची घोषणा पत्रकार परिषदेतून केली. यावेळी त्यांचे समर्थक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी धुमे यांच्या समाजसेवेचा आढावा घेऊन त्यांच्या कार्याची माहिती पत्रकारांना दिली.
कार्यकर्त्यांनी धुमे यांच्या समाजकार्याची माहिती दिली. त्यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना मदत, गरजूंसाठी घरे उभारणे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहाय्य, आरोग्यविषयक मदत, शेतकऱ्यांना बियाणे, शेतीसाठी आवश्यक यंत्रसामग्री व इतर साहित्य उपलब्ध करून देणे, संकटग्रस्त कुटुंबांना तातडीची मदत, तसेच सामाजिक व आध्यात्मिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. शेतकरी, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांना सक्षम करण्यासाठी रोजगारनिर्मिती, शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रांवर विशेष भर देण्याची गरज आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मदत पोहोचविण्याच्या धुमे यांच्या कार्यामुळे त्यांनी निवडणुकीत उतरणे आवश्यक आहे, असेही यावेळी कार्यकर्त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला रमेश माईणकर, नागेश नाईक गावकर, महेश नार्वेकर, श्रेया फाळकर, संजय रेवणकर यांच्यासह कार्यकर्ते व समर्थक उपस्थित होते.
राजकारण हे समाजसेवेचे प्रभावी माध्यम : धुमे
सदगुरु धुमे म्हणाले, राजकारण हे समाजसेवेचे प्रभावी माध्यम आहे. मयेतील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, युवक, महिला आणि गरजू कुटुंबांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन विकासाभिमुख राजकारण करण्याचा आपला संकल्प आहे. कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव आणि जनतेच्या विश्वासाच्या बळावर आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहोत.


