एटीव्ही बाईक बुकिंगच्या बहाण्याने पर्यटकांना लुटले; चौघे जेरबंद

तामिळनाडूतील युवकांची लुबाडणूक

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
01st August, 11:16 pm
एटीव्ही बाईक बुकिंगच्या बहाण्याने पर्यटकांना लुटले; चौघे जेरबंद

म्हापसा : सावतावाडा, कळंगुट येथे एटीव्ही (ऑफ-रोड) बाईक्सचे बुकिंग कार्यालय दाखवण्याचा बहाणा करून तामिळनाडूतील दोन पर्यटक युवकांना अज्ञातस्थळी नेऊन त्यांच्याकडील सुमारे दीड लाख रुपयांचा मुद्देमाल लुबाडल्याप्रकरणी कळंगुट पोलिसांनी चार संशयितांना अटक केली आहे.

अटक केलेल्या संशयितांमध्ये राजेंद्र रमेश नाथ (२५, रा. खोब्रावाडो, कळंगुट व मूळ ओडिशा), सचिन चंदू राठोड (२३, रा. ओर्डा, कांदोळी व बिजापूर, कर्नाटक), टी. साईकिरण टी. सिताराम (२३ , रा. खोब्रावाडो, कळंगुट व मूळ ओडिशा) आणि सुनील भिमु राठोड (२४, रा. ओर्डा, कांदोळी व मूळ बिजापूर, कर्नाटक) यांचा समावेश आहे.

ही घटना गुरुवार, दि. ३० रोजी रात्री ८ च्या सुमारास सावतावाडा कळंगुट येथे घडली. याप्रकरणी लिंगेश सुंदर (१९) यांनी पोलिसांत तक्रार दिली. फिर्यादी लिंगेश हा मंकेश कुमार या आपल्या विद्यार्थी मित्रासमवेत गोव्यात पर्यटनासाठी आला होता. त्यांना गोव्यात कळंगुट येथे समुद्राच्या काठावरील वाळूमध्ये एटीव्ही या ऑफ-रोड बाईक्सचे क्रीडा प्रकार चालतात, अशी माहिती मिळाली होती. त्यामुळे या ऑफ-रोड बाईक्सचा आनंद लुटण्यासाठी ते या बाईक्सच्या बुकिंग ऑफिसचा शोध ते घेत होते. यावेळी त्यांना संशयितांपैकी एकाने हे बुकींग ऑफिस दाखवण्याचा बहाणा करत अज्ञातस्थळी एका गल्लीमध्ये नेले. तिथे अजून तिघे संशयित आले. या सर्वांनी फिर्यादी व त्याच्या मित्राला मारहाण केली.

या घटनेनंतर पर्यटक युवकांनी कळंगुट पोलीस स्थानक गाठत तक्रार दाखल केली. पोलिसांनी चौकशी करून शुक्रवार, ३१ रोजी रात्री वरील चारही संशयितांना पकडून अटक केली. त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी भा.न्या.सं.च्या ११५ (२), १२६ (२), ३५१(२) ३०९(४) व ३ (५) कलमान्वये लुबाडणूकीचा गुन्हा दाखल केला.

म्हापसा न्यायालयाने संशयितांना ६ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किरण नाईक हे करीत आहेत.

दीड लाखांचा मुद्देमाल लुबाडला

पर्यटक युवकांना गंभीर परिणामांची धमकी देत मोबाईल फोन आणि मंकेश कुमार याची गळ्यातील सोन्याची साखळी बळजबरीने त्या चाैघांनी हिसकावून घेतली. तसेच क्यूआर कोड स्कॅन करायला लावून यूपीआयद्वारे २७ हजार रुपये रक्कम हस्तांतरित करण्यास भाग पाडले. याद्वारे सुमारे दीड लाखांचा मुद्देमाल संशयितांनी लुबाडला आणि तिथून त्यांनी पलायन केले. 

हेही वाचा
सर्व पहा