मासेमारी हंगामाला प्रारंभ; मात्र कामगारांअभावी मोजक्याच बोटी समुद्रात

हर्षद धोंड : पणजीतील हंगाम १५ ऑगस्टनंतरच


01st August, 10:42 pm
मासेमारी हंगामाला प्रारंभ; मात्र कामगारांअभावी मोजक्याच बोटी समुद्रात

कामगारांअभावी बेती जेटीवर नांगरून ठेवलेल्या मासेमारी बोटी. (नारायण पिसुर्लेकर)
गोवन वार्ता प्रतिनिधी
पणजी : यंदा मान्सूनने ओढ घेतल्यामुळे मासेमारी बोटीवरील बहुतांश कामगार अद्याप गोव्यात परतलेले नाहीत. त्यामुळे हंगाम सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी केवळ ५ टक्के बोटीच खोल समुद्रात मासेमारीसाठी गेल्या आहेत. प्रत्यक्ष मासेमारी हंगाम १५ ऑगस्टनंतरच सुरू होणार आहे, अशी माहिती अखिल गोवा पर्ससायनर बोटमालक संघटनेचे अध्यक्ष हर्षद धोंड यांनी दिली.
शनिवार, १ ऑगस्टपासून राज्यातील मासेमारी हंगामाला सुरुवात झाली. या पार्श्वभूमीवर पहिल्या दिवसाची माहिती देताना धोंड बोलत होते. गोव्यातील बहुतांश मासेमारी बोटीवरील कामगार झारखंडमधून, तर काही थोडकेच ओडिशातून येतात. तेथे पाऊस सुरू होण्यास विलंब झाल्याने त्यांना गोव्यात येण्यास उशीर होत आहे. अद्याप मोठ्या संख्येने कामगार पणजीत दाखल झाले नसल्याने बहुतांश बोटी तशाच नांगरून ठेवण्यात आल्या आहेत. वास्को आणि बेतुल येथील काही कामगार दाखल झाले असून त्यांनी मासेमारी व्यवसाय सुरू केला आहे. मात्र, पणजीत १५ ऑगस्टनंतरच मासेमारी सुरू होईल, असे धोंड यांनी सांगितले.
पश्चिम घाट भागात पावसाची कमतरता आहे. गोव्यात मोठ्या प्रमाणात पावसाची तूट आहे. मान्सूनच्या शेवटच्या टप्प्यात पावसाने जोर लावला तर खराब हवामानामुळे मासेमारी व्यवसायात अडथळे निर्माण होऊ शकतात, अशी भीतीही हर्षद धोंड यांनी व्यक्त केली.
शेतीची कामे लांबल्याने कामगारांना विलंब
मे किंवा जून महिन्यात हे कामगार आपल्या गावाकडे जातात आणि तेथे शेतीची कामे करतात. शेतीची कामे पूर्ण झाल्यानंतर १० ऑगस्टपर्यंत ते दरवर्षी गोव्यात दाखल होत असतात. मात्र, यंदा पावसाला उशीर झाल्याने शेतीची कामे लांबली आहेत. त्यामुळे बोटीवरील कामगार गोव्यात उशिरा दाखल होणार आहेत. परिणामी, १५ ते २० ऑगस्टनंतरच बहुतांश बोटी समुद्रात उतरतील. सध्या केवळ ५ टक्के बोटी समुद्रात गेल्या आहेत, असे हर्षद धोंड यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा
सर्व पहा