राज्यात दररोज सरासरी एकापेक्षा जास्त व्यक्तींना सर्पदंश!

सुदैवाने एकाही मृत्यूची नोंद नाही : प्रतिबंधासाठी केंद्राकडून राज्यांना विशेष निधी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
01st August, 09:52 pm
राज्यात दररोज सरासरी एकापेक्षा जास्त व्यक्तींना सर्पदंश!

गोव्यात गेल्या तीन वर्षांत (२०२३ ते २०२५) सर्पदंशाच्या तब्बल १,६०२ घटनांची नोंद झाली असून, राज्यात दररोज सरासरी एकापेक्षा अधिक व्यक्तींना सर्पदंश होत असल्याचे समोर आले आहे. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे या कालावधीत सर्पदंशामुळे एकाही मृत्यूची नोंद झालेली नसल्याची माहिती केंद्रीय आरोग्य खात्याने जाहीर केली आहे.

दरवर्षी सरासरी ५३४ सर्पदंशाच्या घटना

राज्यात दरवर्षी सरासरी ५३४, तर महिन्याला सरासरी ४४ सर्पदंशाच्या घटना घडल्या आहेत. ही सर्व आकडेवारी राज्य सरकारने ‘आयडीएसपी’ (IDSP) आणि ‘आयएचआयपी’ (IHIP) या केंद्रीय प्रणालींवर अधिकृतरीत्या नोंदविल्याचे केंद्रीय आरोग्य खात्याने स्पष्ट केले आहे.

केंद्रीय आकडेवारीनुसार, २०२३ ते २०२५ या कालावधीत देशभरात सर्पदंशाच्या एकूण ३ लाख ४७ हजार ५७८ घटना घडल्या. म्हणजेच देशात महिन्याला सरासरी ९,६५४ सर्पदंशाच्या घटनांची नोंद झाली. पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक ६१,६२६ घटना नोंदल्या गेल्या असून, त्यापाठोपाठ तामिळनाडू (५१,७७४) आणि ओडिशा (४१,८२२) यांचा क्रमांक लागतो. मणिपूरमध्ये सर्वात कमी, म्हणजे ३७२ घटना नोंदवण्यात आल्या.

देशभरात ९८७ जणांचा मृत्यूयाच तीन वर्षांच्या कालावधीत देशभरात सर्पदंशामुळे ९८७ जणांचा मृत्यू झाला असून, महिन्याला सरासरी २७ जणांचा जीव गेला आहे. कर्नाटकमध्ये सर्वाधिक २८० मृत्यू झाले, तर पश्चिम बंगालमध्ये १५५, तामिळनाडूमध्ये ९६ आणि ओडिशामध्ये ८३ मृत्यूंची नोंद झाली आहे.
सर्पदंश प्रतिबंधासाठी राष्ट्रीय कृती आराखडा

सर्पदंश प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी केंद्र सरकारने २०२४ मध्ये ‘राष्ट्रीय कृती आराखडा’ तयार केला आहे. या आराखड्याअंतर्गत राज्यांना सर्पदंश प्रतिबंधक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जात आहे. तसेच आयडीएसपी आणि आयएचआयपी प्रणालीवरील आकडेवारीच्या आधारे राज्यांना सर्पदंशविरोधी लसींचाही पुरवठा केला जात आहे.

राज्यांना औषधे आणि प्रशिक्षणासाठी मदत

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत केंद्र सरकार राज्यांना सर्पदंशावरील औषधे, आवश्यक उपकरणे आणि उपचारासाठी लागणाऱ्या सुविधा उपलब्ध करून देते. तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांना सर्पदंश व्यवस्थापन, आपत्कालीन उपचार आणि नियंत्रण याबाबत प्रशिक्षण, जनजागृती मोहिमा आणि आंतरविभागीय समन्वयासाठीही आर्थिक मदत दिली जाते.

‘अधिसूचित आजार’ घोषित करण्याच्या सूचना

सर्पदंशाच्या घटना आणि मृत्यूंची प्रभावी नोंद व देखरेख ठेवण्यासाठी केंद्र सरकारने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सर्पदंशाला ‘अधिसूचित करण्यायोग्य आजार’ म्हणून घोषित करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. राज्य सार्वजनिक आरोग्य कायदा आणि संबंधित नियमांनुसार आवश्यक कार्यवाही करण्याबाबतही पत्र पाठविण्यात आल्याचे केंद्रीय आरोग्य खात्याने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा
सर्व पहा