केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पुष्पगुच्छ देताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत.
गोवन वार्ता प्रतिनिधी
पणजी : एसटी राजकीय आरक्षणाची प्रक्रिया गतिमान करून लवकरात लवकर एसटीना विधानसभेत आरक्षण देण्याचे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिले. दिल्लीत भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली. केंद्रीय गृहमंत्री ६ व ७ सप्टेंबर रोजी गोव्यात येणार असून पर्वरी उड्डाण पुलासह भाजप मुख्यालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. गोवा भेटीचे निमंत्रण मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिले आहे.
संसदेत गोवा एसटी आरक्षण विधेयक संमत होऊन कायदा झाला असला तरी त्याची कार्यवाही झालेली नाही. आरक्षण लागू करण्याची अधिसूचना जारी करून निवडणूक आयोगाला योग्य ते आदेश देणे बाकी आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी एसटी आरक्षणाची कार्यवाही करण्याची एसटी समाजाची मागणी आहे. या मागणीसाठी सर्व एसटी नेते एकत्र आले असून त्यानी आंदोलनाचाही इशारा दिला आहे. एसटी नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने मुख्यमंत्र्यांनीसुद्धा कार्यवाहीचा पाठपुरावा सुरू केला आहे. मंगळवारी विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावल्यानंतर त्यानी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा यांची भेट घेतली. एसटी आरक्षण तसेच राज्याच्या विकासावर भेटी दरम्यान चर्चा झाली.
विधानसभेचा कार्यकाळ पुढच्या वर्षी संपणार असला तरी त्यापूर्वीच निवडणूक होणार आहे. राजकीय पक्षांकडून निवडणुकीची तयारी सुरू असतानाच सरकारकडून विकासकामांचा धडाका सुरू आहे. निवडणुकीपूर्वी पर्वरी उड्डाणपूल, तसेच गवंडाळी उड्डाणपूल पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
एसटी आरक्षणाचा कायदा झाला असला तरी अद्याप कार्यवाही झाली नसल्याने एसटी नेत्यांमध्ये निराशेचे वातावरण आहे. यासाठी ‘उटा’च्या बॅनरखाली अनेक बैठका झाल्या. महिन्यापूर्वी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. या भेटीला महिना उलटून गेला असला तरी अद्याप आरक्षणाबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. या पार्श्वभूमीवर १५ दिवसांत केंद्राकडून निर्णय होणार असल्याचा विश्वास आदिवासी कल्याण मंत्री रमेश तवडकर यांनी व्यक्त केला आहे. काही राज्यांना २०११च्या जनगणनेनुसार आरक्षण दिलेले आहे. गोव्यातसुद्धा २०११च्या जनगणनेवर आधारित आरक्षण लागू करणे शक्य आहे, असे मत त्यानी मांडले. २०११ नंतर जनगणना झालेली नाही. आता जनगणनेची प्रक्रिया सुरू होऊन पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. जनगणनेचा दुसरा टप्पा विधानसभा निवडणुकीपूर्वी पूर्ण होणे अशक्य आहे. त्यामुळे २०११च्या जनगणनेवर आधारित आरक्षण लागू करण्याची एसटी नेत्यांची मागणी आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या आश्वासनामुळे एसटी नेत्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.
पर्वरी उड्डाणपुलासह भाजप मुख्यालयाचे सप्टेंबरात उद्घाटन
पर्वरीचा उड्डाणपूल पूर्ण झाला असून उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते उड्डाणपुलाचे जंगी स्वरूपात उद्घाटन करण्याचा सरकारचा मानस आहे. गणेश चतुर्थीपूर्वी उड्डाणपुलाचे उद्घाटन होणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांनी जाहीर केले आहे. ६ सप्टेंबर रोजी गोव्यात आगमन झाल्यानंतर अमित शहा यांच्या हस्ते पर्वरी उड्डाणपुलाचे, कदंब पठारावरील भाजप मुख्यालय इमारतीचे आणि इतर प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात येणार आहे.


