पणजी : बार्देशमधील मूळ कर्नाटकातील १४ वर्षीय मुलीवर मातृत्व लादण्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पीडित मुलगी व बाळाचा डीएनए चाचणीसाठी चार संशयिताचे रक्ताचे नमुने गोळा करून न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात बुधवार ५ आॅगस्ट रोजी होणार आहे.
पीडित मुलीच्या आईने गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून मुलगी व नवजात बाळाचा ताबा आपल्याकडे देण्याची मागणी केली आहे. जून महिन्यात मुलीला त्रास सुरू झाल्यानंतर खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तिने बाळाला जन्म दिल्याचे समोर आले. मुलगी अल्पवयीन असल्याने या घटनेची माहिती बार्देश पोलिसांना देण्यात आली होती. पोलिसांनी पीडितेचा आणि तिच्या नातेवाईकांचा जबाब नोंद केला. मात्र कोणी मातृत्व लादले, याबाबत माहिती देण्यास त्यांनी नकार दिला.
या प्रकरणाचा तपास पणजी महिला पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. बाल कल्याण समितीच्या माध्यमातून पीडित मुलगी व नवजात बाळाला संरक्षण देण्यात आले असून, सध्या त्यांना मेरशी येथील ‘अपना घरा’त ठेवण्यात आले आहे. डीएनए चाचणीचा अहवाल आल्यानंतर तपासाची पुढील दिशा निश्चित होणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
तपासात डीएनए चाचणीला प्राधान्य
प्रारंभी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पीडित मुलगी, तिचे बाळ आणि कुटुंबातील एका व्यक्तीचे डीएनए नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल निष्फळ आल्यानंतर आता मुलीच्या परिचयातील चार संशयितांच्या रक्ताचे नमुने गोळा करून न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.


